कोल्हापूर | कोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच असल्याचा चित्र दिसून येत आहे. आता या यादीमध्ये लग्न ठरत नसल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलताना गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. सदर धक्कादायक घटना शिंगणापूरमध्ये घडली. चेतन भिवाजी चौगले असे मृतकाचे नाव आहे. वय होऊनही लग्न न झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
चेतनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न ठरवण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, योग जुळून न आल्याने चेतन नैराश्यात होता. या नैराश्यातून चौगुले मळ्यातील जनावरांच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर त्याच्या संपूर्ण गावात एकाच शोककळा पसरली आहे.
चेतन दहावीपर्यंत शिकला होता. तो वडिलांसह शेत करत होता. दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असतानाही लग्न होत नसल्याने त्याला नैराश्याने ग्रासले होते. गेल्या काही वर्षांपासून शेती करणाऱ्या मुलांच्या विवाहाचा गंभीर प्रश्न झाला आहे. यामधून विवाह जुळवण्याच्या नावाखाली फसवणुकीचेही प्रकार झाले आहेत. मागच्या काही काळापासून लग्न जुळवण्याचा बहाणा करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे प्रमाणात वाढले आहे.