Latest Marathi News

BREAKING NEWS

आम्हाला हवा आहे फॅमिली डॉक्टर !

0

बार्शी / सचिन अपसिंगकर:

मानवी जीवनामध्ये वैद्यकीय क्षेत्राचे मूलभूत गरज आणि अनन्य साधारण महत्व आहे. वैद्यकीय क्षेत्राला उदात्तपेशा असे संबोधले जाते. मानवी शरीर हे निसर्गाने निर्माण केलेली वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती, कलाकृती, आणि रचना आहे. मानवी शरीरामध्ये पंचेंद्रिय अर्थात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय क्रियाशील असतात. गर्भावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत मानवी शरीराच्या चलनवलनामध्ये अनेकवेळा नैसर्गिकरीत्या काहीवेळा कृत्रिमरित्या विविध कारणांमुळे बिघाड होतात. मानवी शरीराच्या या क्रियाकर्मामध्ये आलेल्या अडथळयांना सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची नितांत गरज असते.

आज जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातही अत्युच्च संशोधन झाले आहे. या संशोधनाचा परिपाक म्हणून तंत्रज्ञान क्रांति झाली आहे. वैद्यकीय ज्ञानाने परमावधी गाठला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान शाखांचे विशेषीकरण वाढले आहे. अॅलोपॅथी बरोबरच आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, नॅचरोपॅथी, यासारख्या अनेक वैद्यकीय शाखा झाल्या आहेत. निदान, उपचार, शस्त्रक्रिया, औषधोपचार, यासर्व आघाड्यांवर क्रांतिकारी बदल झाले आहेत. अगदी विकसित मानल्या जाणार्या  मेंदुवरील उपचार व शल्यकर्ममध्ये ही अभूतपूर्व बदल झाले आहेत. नेत्ररोपणापासून हृदयरोपणापर्यंत आणि कृत्रिम पायापासून प्लॅस्टिक सर्जरी पर्यंत वैद्यकीय उपचार पद्धती व कृत्रिम अवयव निर्मिती पर्यंत झालेले बदल हे विस्मय चकित करणारे आहेत. अवेक, ओपन हार्ट सर्जरी पासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत असणारे तंत्रज्ञानांचे उपयोजन ही अत्याधुनीक वैद्यकीय जगताची साक्ष पटविणारी आहे. 

वैद्यकीय क्षेत्र हे नवजीवन जिवदान आणि नवसंजीवनी देणारे महत्वाचे क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात कार्यरत डॉक्टर्स हे उच्च बुध्यांक असणारेच मानले जातात. त्याचप्रमाणे त्यांना विशेषज्ञान व प्रशिक्षण दिले जाते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोण हा सन्मान व आदरयुक्त आहे. जगभरामध्ये अगदी मरण पंथाला लागलेल्या लक्षावधि रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेल्या जिवदानाचे गोडवे गायले आहेत.

वैद्यकीय क्षेत्र हे आज जगातील मोठी गुंतवणूक असणारे क्षेत्र मानले जाते. खाजगी हॉस्पिटल पासून ते गगनचुंबी इमारतींच्या मल्टी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल पर्यंत कळस या क्षेत्राने गाठला आहे. डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोण लक्षात घेत असताना या क्षेत्रात झालेल्या बदलांकडेही आपल्याला विचारपूर्वक पहावे लागेल. जगातील बहुतांश देशांच्या सरकारने जनतेच आरोग्य ही आपली जवाबदारी मानली आहे. कोणत्याही लोककल्याणकारी शासनसंस्थेने जनतेच्या आरोग्य संवर्धनाच्या अधिकाराला मूलभूत हक्क व अधिकार मानले आहे. प्रत्येक देशाच्या सरकारी अंदाज पत्रकांमध्ये जनतेच्या सार्वजनिक आरोग्याबाबत विशेष निधीची तरतूद ही असतेच. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा व महानगरांपर्यंत शासकीय रुग्णालयांची साखळी निर्माण केलेली आहे. मात्र या सरकारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दर्जा, साधनसामुग्री, पायाभूत सुविधा, कुशल व तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित परिचर अन्य कर्मचारी वृंद व सुविधा यांचा दर्जा मात्र फारसा समाधान कारक नाही. आजही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली असली तरी देशभरातील दुर्गम भागात वाड्यावस्तीपर्यंत ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचे जाळे पोहोचलेले नाही. आजही देशात गरोदर स्त्रियापासून ते विकलांग, अपंग व वृद्धांपर्यंत मूलभूत आणि प्राथमिक आरोग्य सुविधा सुद्धा पोहोचू शकत नाहीत, ही खेद जनक वस्तुस्थिति आहे. वैद्यकीय क्षेत्राला सेवाभावी दृष्टीकोण असणार्या् वैद्यकांची अत्यावश्यक गरज आहे. मात्र दुर्दैवाने या क्षेत्रातील सेवाभाव लोपत चालला असल्याची खंत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये खाजगीकरण मोठ्या प्रमाणात आहे. वैद्यकीयशिक्षण घेण्यापासून ते दवाखाना सुरू करण्यापर्यंत आणि महागड्या मशीनरीज घेण्यापासून ते कुशल तंत्रज्ञांच्या भरतीपासून अनेक आघाड्यांवर खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांकडून रुग्णांना विविध चाचण्या, उपचार, शस्त्रक्रिया खर्च, औषधोपचार याबाबत आकारले जाणारे शुल्क हे दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, आणि दर्जेदार आरोग्य सुविधा खाजगी दवाखान्यांच्या माध्यमातून समाजातील सामान्य व आर्थिक दुर्बल घटकांना उपलब्ध होणे हे सहज साध्य राहिलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. अनेकवेळा अनावश्यक वैद्यकीय चाचण्या व अन्य उपचारांना तोंडदेण्यास रुग्णांना अकारण भाग पाडले जात असल्याचे ही प्रवाद आज ह्या क्षेत्रात निर्माण झाले आहेत.
पूर्वी म्हणजे साधारणत: ५० वर्षांपूर्वी वैद्यकीय शाखांचे विशेषीकरण नव्हते. तेंव्हा एकाच डॉक्टरकडे सर्वरोग निदानासाठी जाण्याची पद्धत होती. तेंव्हा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना असायची. डॉक्टर आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना गेली दोन पिढ्या ओळखतो असे सांगायचे. फॅमिली मेडिकल हिस्टरी डॉक्टरांना माहीत असायची. आता काळ बदलला आहे. डॉक्टरकडे येणार्या् रुग्णांवर आणि डॉक्टरवर ही आधुनिक जीवन शैलीचा प्रभाव आहे. पूर्वी रुग्णांना औषधोपचार देण्याबरोबरच त्यांचे मानसिक सबलीकरण आणि समुपदेशन करण्याचे काम ही डॉक्टर अगदी सहजपणे ओघात करायचे. आता इतर सहकारी डॉक्टर्स आणि तंत्रज्ञ यांच्या चाचण्यानमधून मुख्य डॉक्टरपर्यंत आलेल्या रुग्णाकडे कटाक्ष टाकून रिपोर्ट्स पाहणे आणि प्रिस्क्रिप्शन देणे यापलीकडे रुग्णांना बोलण्यास डॉक्टरना वेळ मिळत नाही. इतकी धावपळीची आणि कार्यमग्न दिनचर्या डॉक्टरांची असते, आणि या बदलांना स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. हे वास्तव आहे. डॉक्टर ही माणूसच असतो. शेकडो रुग्णांना दिवसभर हाताळणे, शस्त्रक्रिया करणे, राऊंडस घेणे आणि आत्यावश्यक परिस्थितिमध्ये अगदी मध्यरात्री सुद्धा रुग्णांसाठी धावपळ करत येणे याकडे ही समाजाला सहानभूतीपूर्वक पहावेच लागेल. डॉक्टर्स डेच्या निमिताने याक्षेत्रातील सर्वच डॉक्टर्सचे कौतुकच झाले पाहिजे. त्यांना सन्मानित करणे गरजेचं आहे. तसेच कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात काही अपप्रवृत्ती सोडल्या तर सरकारी व खाजगी डॉक्टर्सनी अगदी आपल्या प्राणांची बाजी लावून अहोरात्र काम केले आहे. हे नाकारता येणार नाही.

आज वैद्यकीय क्षेत्राला ग्राहक हित कायद्याच्याही कक्षेत सामावून घेतले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वैद्यकांवरील जवाबदारीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांना दिल्या जाणार्याी सुविधा ही डॉक्टरची कार्यपद्धती याबाबत अनेक मत मतांतरे व विवाद आहेत. परंतु या क्षेत्राचे महत्व मात्र जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार आहे. “रुग्णांमध्ये आपल्या निकटच्या नातेवाईकाला पहा आणि मग निदान उपचार करा”, असे माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांनी म्हणले होते. डॉक्टर्स ही समाजाची प्राणशक्ति आहे. त्यामुळे या पेशाचे स्थान, प्रतिष्ठा, माहात्म्य, वाढीस लागावेत यासाठी डॉक्टरांबरोबरच सर्व समाजघटकांनीही आपापले उत्तर दायित्व ओळखले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.