Latest Marathi News

BREAKING NEWS

शेट्टी यांनी आमदारकीसाठी ‘स्वाभिमान’ विकला

0

कोल्हापूर : कधीकाळी बारामतीत राजू शेट्टी यांनी चळवळीचा इतिहास रचला त्याच बारामतीत आमदारकीसाठी ते शरण गेले. शेट्टी यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला. कार्यकर्त्यांच्या निष्ठेची चेष्टा केली, अशी बोचरी टीका जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला दाम मिळावा यासाठी गावागावात संघर्ष केला. अनेक ठिकाणी साखर सम्राटांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. हे कार्यकर्ते आजही कोर्टाच्या चकरा मारत आहेत. ज्या राष्ट्रवादी बरोबर आजपर्यंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, त्याच पक्षाच्या नेत्यांच्या दारात पदासाठी राजू शेट्टी यांना जावे लागणे ही सर्व कार्यकर्त्यांची शोकांतिका असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.

आमदारकी घ्यायची होती तर त्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार करण्याची गरज होती. स्वाभिमानीकडे डॉ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे असे बिनीचे शिलेदार आहेत. चळवळ वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता; परंतु केवळ सत्ता आणि सत्ता त्याच्याच मागे लागलेल्या शेट्टी यांना कार्यकर्त्याचा कोणतेच सोयरसुतक नाही. यामुळेच त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा आघात करून गोविंदबागेत जावून आमदारकी स्वीकारली

शेतकरी व चळवळीसाठी मार खाल्लेला कार्यकर्ता हे कधीही विसरणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला जाऊन शेट्टीने चळवळ मोडण्याचे पाप केले आहे. भविष्यात त्यांना शेतकरी आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पत्रकात दिला आहे. या पत्रकावर जय शिवरायचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, तालुकाध्यक्ष गब्बर पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष बंडा पाटील, मार्गदर्शक सदाशिव कुलकर्णी, रामदास वड्ड, उत्तम पाटील, दत्ता शिंदे यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.