काँग्रेस खासदार राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. मणिपूर हिंसाचारासंदर्बात बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या होत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितल्यानंतर सभागृहात मोठा गदरोळ निर्माण झाला. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्ष संतप्त झाला आहे. या संदर्भात भाजपच्या खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रश्न केला आहे.
हेही वाचा >>“काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही”, नरेंद्र मोदींचं वक्तव्य
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी आज लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर बोलताना आपली भूमिका मांडली. “यांनी मणिपूरमध्य हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.
हेही वाचा >>“पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही, कारण तुम्ही तिथे…!”, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. स्मृती इराणींनी यावर आक्षेप घेत विरोधकांव हल्लाबोल केला. “देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेच्या हत्येबाबत बोललं गेलं. काँग्रेस पक्ष यावर टाळ्या वाजवत होता. यातून अवघ्या देशाला संदेश दिला की कुणाच्या मनात गद्दारी आहे. मणिपूर विभाजित नाही, तो आमच्या देशाचा एक भाग आहे. डीएमकेच्या एका सदस्याने तमिळनाडूत म्हटलं की भारत म्हणजे फक्त उत्तर भारत.राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर त्यांचं वक्तव्य फेटाळून दाखवावं”, असं थेट आव्हान स्मृती इराणींनी दिलं.
“काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं काश्मीरमध्ये जनमताबाबत थेट कोर्टात विधान केलं. जर गांधी खानदानात हिंमत असेल, तर या देशाला त्यांनी सांगावं की काश्मीरला देशापासून वेगळं काढण्याच्या कारस्थानात काँग्रेसच्या त्या नेत्याचं विधान का आहे? तुम्ही अजिबात ‘इंडिया’ नाहीत”, असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या.