खरं तर चांगल्या आणी वाईट गोष्टीची चर्चा ही नेहमी होतच असते. पण चांगल्या गोष्टीची चर्चा तर ही व्हायलाच पाहीजे, कां ते सांगतो.
आज मी माझा मित्र हेमंत ऐदलाबादकर ह्यांचे नवं कोरकरकरीत नाटक “चर्चा तर होणारच” हे नाटक पाहायला गेलो. नाटकाचे निर्माते व माझे मित्र गोपाळ अलगेरी ह्यांचाही फोन आला होता, आज नाटक पाहायला आवश्य याच असा. खरंतर मला खूप कंटाळा आला होता. पण माझी नाट्य निर्माती असलेली पत्नी पद्मजा दिपक नलावडे हीने ही आग्रह केला. आणी मग आम्ही गडकरी रंगायतन ठाणे येथे नाटक पाहायला गेलो. गोपाळजींनी माझी तिकीटे फ्री पास म्हणून ठेवलीच होती. पण मी तिकिटाचे पैसे देत होतो, गोपाळ अलगेरी बोलले, अहो नलावडे साहेब फ्री पास आहेत, मी बोललो अजिबात नाही, एका निर्मात्याचे दुःख दुसऱ्या निर्मात्याला कळायला हवंय. माझ्या तिकिटाचे पैश्यातून एकदोन कर्मचाऱ्याचे मानधनाचे पाकीट भरेल, आणी मी पैसे देऊनच तिकिटे घेतली मगच नाटक पहायला आत गेलो.

तिसरी घंटा झाली आणी गडकरी रंगायतन ह्या नाट्य गृहाचा तो विशाल सुप्रसिद्ध असा पडदा उघडला. आणी संदेश बेंद्रेचे नेपथ्य पाहूनच मला आलेला कंटाळा खाडकन निघून गेला. खरोखरच भव्यदिव्य असं घर पाहून, आज काहीतरी चांगलंच पहायला मिळणार असं मनोमन वाटलं. स्टेजवर देशपांडे (क्षितीज झारापकर) मोठ्या NGO चे मॅनेजर होते. तेवढ्यात सत्यजितची (आस्ताद काळे) एन्ट्री झाली. देशपांडे आणी सत्यजितचं बोलणं चालू होतं, तेंव्हाच ह्या नाटकांत दम असल्याचं जाणवलं, आणी तेव्हढ्यात मृणालची (आदिती सारंगधर) एन्ट्री झाली, वा ! काय ती एन्ट्री !! आणी तिच्या दोनतीन वाक्यातच नाटकाने पकड घ्यायला सुरुवात केली. देशपांडेनी तर क्षितीजच कवेत घेतलं आणी इकडे आस्ते आस्ते आस्ताद काळे सुटलाच. आणी आदितीने तर जे बेरींग पकडलं ते शेवट पर्यंत सुटूच दिलं नाही. हेमंत ऐदलाबादकरचं लिखाण त्यात त्याचंच दिग्दर्शन म्हणजे गुळाचा चहा पिऊ की साखरेचा चहा पिऊ असं झालं.
नाटकाचा विषय तर खूपच छान.
आज समाज राजकीय वातावरणामुळे ढवळून निघाला आहे, एकमेकांना पाण्यात पाहणे, त्रास देणे, आपल्या स्वार्थासाठी समाजात दूही माजविणे, जातीयवादी जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली जाते आहे. ह्याचा उल्लेखही न करता, कसलेही कडू औषध न देता, अगदी आयोडीन लावून हेमंत ऐदलाबादकरने समाजाला इंजेक्शन दिलेलं आहे.
हेमंतने अगदी सहज जोगळेकर गुरुजींची शिकवण (संस्कृती) आणी एक कामगार असलेला कांबळे ह्याने दाखविलेले औदार्य कसं एकच आहे हे बेमालूमपणे दाखवलं आहे. आणी ते आदिती सारंगधरने सहज अभिनयाने उत्कृष्टपणे सादर केलं आहे. ते मनाला ठसल्या शिवाय रहात नाही.
तसंच जगातील सर्वात सुंदर चांगलं पुस्तक कोणतं असेल तर ते आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी भारत देशासाठी लिहीलेले व देशाला २६ जानेवारी १९५० रोजी दिलेले “भारतीय संविधान”
हे इतके सहज सांगितले आहे की बघतच रहावे असे वाटते. आणी ते आस्ताद काळे आणी आदिती सारंगधरने तो सीन तर खूप सुंदर सादर करीत जीवंत केला आहे.
आपल्या भारत देशात धर्म, राजकारण, दिवंगत नेत्यांचे मानापमान, ह्या व्यतिरिक्त कित्येक सामाजिक प्रश्न पडलेले आहेत त्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे सांगताना, मृणाल (आदिती सारंगधर) समाजातील दुर्लक्षित आशा वेश्या आणी त्यांची मुले (कि त्यांचा बाप कोण आहे सांगूच शकत नाही) अशा मुलांचे प्रश्न सोडवत असते, सांभाळत असते,. त्यातच एक सिन तर खूपच महत्वाचा आहे, मृणाल सत्यजितला सांगते की, काही गरीब मजुरी करणाऱ्या बायकांना एक चांगल्या, सधन घरातील बाई एका लक्ष्मी पुजेचे महत्व सांगते, व लक्ष्मी पुजनाचे महत्व सांगणारे पुस्तक देते व त्या पुस्तकात दिलेली कहाणी वाचायला हवी तरच लक्ष्मी प्राप्त होते असेही सांगते, पण तसं पुढं होतच नाही, पण पुस्तक छापणारा मात्र लक्ष्मी प्राप्त पुत्र होतो. ह्या अशा अंधश्रद्धेला देखील ह्या नाटकाने हात घातलेला आहे.
आजच्या राजकारणामुळे तरुण कसा भरकटत चालला आहे आणी नाटकातील रावसाहेब काळे ह्या राजकीय वजनदार व्यक्तीला कसं वठणीवर आणलं जातं व हे काम तरुण वर्गाने कसं करावं, हे हेमंत ऐदलाबादकरचे लेखणीने आणी आस्ताद काळे व आदिती सारंगधरच्या अभिनयातून खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे.
समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक व्यक्तीने विशेषतः राजकीय आमदार खासदारांचे मागे पळणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी हे नाटक अवश्य पहायलाच हवं.
“समाज को बदल बालों” असं सांगणारं नाटक समाजाला दिल्या बद्दल हेमंत ऐदलाबादकर आणी ते उत्कृष्ट सादर केल्या बद्दल क्षितीज झारापकर, आस्ताद काळे व आदिती सारंगधर तसेच ह्या सामाजिक नाटकाची निर्मिती केल्या बद्दल श्रीमती कल्पना कोठारी व गोपाळ अलगेरी ह्यांच जेवढं कौतुक करु तेवढं कमीच होईल.
असो अशा सामाजिक नाटकाचे ५००० च्या वर व महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात प्रयोग होवोत अशा माझ्या शुभेच्छा आहेत.
आणखी एक सांगायचं आहे की
आदिती सारंगधरने हेमंत ऐदलाबादकरनेच लिहीलेल्या माझ्या पहिला मराठी सिनेमा “ती रात्र” मध्ये खूपच छान अभिनय केला होता. खरंतर तिला ह्या सिनेमाचे उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून बक्षीस मिळायला हवं होतं. पण नाही मिळालं. असो आता “चर्चा तर होणारच” ह्या नाटकातील अभिनयाचे आदितीला नक्कीच उत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळणार आणी हे नाटक ही ह्या वर्षातील सर्वोत्तम नाटक ठरेल अशी माझी खात्री आहे.
दिपक बजरंग नलावडे
9930183789