Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवरायांविरोधातील वक्तव्यावरुन आमदार संजय गायकवाड यांचा भाजपाला इशारा

0

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आता सत्ताधारी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे नेते सुधांशू यांच्यावर हल्लबोल केला आहे. छत्रपतींचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले की, “शिवछत्रपतींचा इतिहास कधीही जुना होत नाही. त्यांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही. राज्यपाल सातत्याने शिवरायांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी करतात. ते यापूर्वी सुद्धा अनेक वेळा त्यांनी छत्रपतींबद्दल बोलले आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहिती नाही, अशा राज्यपालांना खुर्चीवर ठेऊन काही फायदा नाही. मराठी मातीतला माणूसच या ठिकाणी हवा. त्यामुळे या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे तिथे पाठवा.”

तर आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा देखील समाचार घेतला. “शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. राज्यपालांनी, भाजपच्या लोकांनी विचार करुन छत्रपतींच्या बाबतीत बोललं पाहिजे. अशाप्रकारचा अपमान आम्ही सहन करणार नाही. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर हे चांगलं नाही, अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील,” असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.