अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा नेत्यांकडून केला जातो. परंतु अनेक निर्णयांवर आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं वेळोवेळी पुढे आलेले आहे. आता सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्द करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ योजनेच्या जाहिरातीवरून कॉंग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला महत्त्व दिले जात काँग्रेसकडून अधोरेखित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच महाजॉब्स ही योजना सुरु झाली. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही, यामुळे तांबे यांनी महाजॉब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना – राष्ट्रवादीची ? असा सवाल केला आहे.
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. असं काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. pic.twitter.com/k8CMmOsmJv— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 16, 2020
तांबे यांनी ट्विटसोबत तांबे फोटो जोडलेला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.