मुंबई: भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिथे राहिले, त्या ‘राजगृह’ या दादरमधील घराची काही अज्ञात इसमांनी तोडफोड केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अज्ञात व्यक्तींनी घरातील खिडकीच्या काचांवर दगड मारून त्या फोडल्या. तसेच घराच्या परिसरात असणारे सीसीटीव्ही कॅमेरे, घरातील कुंड्या व झाडांची नासधूस केली.
दरम्यान, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
दादरमध्ये असणाऱ्या या दोन मजली बंगल्यात आंबेडकर संग्रहालय आहे. जिथे बाबासाहेबांची अनेक पुस्तके, चित्र, अस्थी आणि भांडे तसेच अनेक कालाकृत्या ठेवलेल्या आहेत. सध्या घरामध्ये बाबासाहेबांची सून, त्यांचे नातू , वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आनंदराव आणि भीमराव राहतात. ही घटना घडली तेंव्हा प्रकाश आंबेडकर घरात नव्हते, ते अकोल्यात असल्याचे समजते आहे. दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.