Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनेसाठी राष्ट्रवादीचे एक पाऊल मागे ? ‘त्या’ नगरसेवकांची शिवसेनेत होणार घरवापसी

0

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आमदार निलेश लंके यांचे समर्थक असणाऱ्या या  नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याने विरोधकांना आयतेच टीका करण्याचे कोलीत मिळाले होते. अखेर आता राजकीय नाट्यावर पडदा पडला असून नगरसेवक पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतणार आहेत.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी केला होता. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी मध्यस्थी करावी लागली. पवार यांनी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी अजित पवार हे देखील उपस्थित होते.

शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिला होता. हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित पवार यांना पोहचवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.