मुंबई महानगरपालिकेवर आज शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. मात्र मोर्चा निघण्याआधीच मुंबईतील वातावरण तापलेलं दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आवारात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे फलक लावण्यात आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा विरोधात सुशां सिंह याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयन्त करताना दिसून येणार आहे
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा निघणार आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांकडून महानगरपालिका परिसरात त्याला न्याय मिळवून द्या अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आवारात लागलेले फलक पाहून एकच खळबळ उडाली आहे. मात्र हे फलक चाहत्यांनी लावले की विरोधकांनी यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी सुशांत सिंग राजपुतला न्याय द्या अशी मागणी फलक लावत केली आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असे देखील या बॅनरमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरे गटाचा मोर्चा आज (१ जुलै) दुपारी २ वाजता वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा) येथून सुरु होईल. तसेच महानगरपालिका मार्गावरून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे. तत्पूर्वी या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती.