कोरोनाची साथ सुरू झाल्यावर बरेच दिवस सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता.अचानक एक रुग्ण सापडला व संसर्गाला सुरुवात झाली. काही दिवसातच एकाचे शंभर झाल्यावर तरी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी कडक पावले उचलतील असे वाटत होते. पण कसचे काय, बघता बघता हा आकडा दीड हजाराच्या पुढे गेला आणि आता सोलापूर एक ‘हॉटस्पॉट’ झाला आहे.
खाजगी रुग्णालये बंद, सिव्हील हॉस्पिटल ओव्हरफुल्ल, गोरगरीब रुग्णांचे हाल सुरू झाले. त्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही. क्वारंटाईन केलेले संभाव्य पॉझिटिव्ह, निगेटिव्ह लोक एकाच जागेत कोंडलेले, सर्वांसाठी कॉमन संडास बाथरूम क्वारंटाईन करून पाच-सहा दिवस झाले तरी टेस्टचा रिपोर्ट नाही. अशा एक नाहीतर शेकडो तक्रारी. पण त्याची दखल घ्यायला कोणी नाही. कोणी फोन उचलत नाही उचलला तर स्वतःची जबाबदारी झटकत दुसऱ्याकडे बोट दाखवून मोकळा!
खरेतर शासनाची आरोग्य व्यवस्था अगोदरपासूनच मोडकळीला आलेली होती. ती कोरोना रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे पूर्णपणे कोलमडली. कोरोनाच्या भीतीने आधीच अर्धमेल्या झालेल्या लोकांची शासनाच्या गलथान कारभारामुळे ‘आपल्याला आता कोणी वाली नाही’ अशी अवस्था झाली. आपली दखल घ्यायला, तक्रार ऐकायला कोणीही नाही, हे पाहून जेव्हा त्यांची घुसमट सुरू झाली तेंव्हा या लोकांनी मोबाईलचा आधार घेतला.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकांच्या हाती ‘बोंब मारायला’ आता मोबाईल व त्यावरची व्हॉट्सॲप, युट्युब,फेसबूक इत्यादी हक्काची प्रसार माध्यमे उपलब्ध झाली आहेत. योग्य वैद्यकीय उपचाराअभावी अनेकांचे जीव गेले, क्वारंटाईनमुळे निगेटिव्हचे पॉझिटिव्ह होऊन अनेकांचे जीव जायची वेळ आली परंतु आपल्या तक्रारीची दखल घ्यायला,आपला आक्रोश ऐकायला कोणी तयार नाही.हे पाहून त्यातल्या काही शहाण्या लोकांनी अखेर आपल्या हातातल्या हक्काच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आधार घेतला.
वैद्यकीय क्षेत्रातील कर्तव्यच्युत लोकांनी व बेफिकीर शासकीय अधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांच्या जीवाशी जो खेळ खेळला. त्याच्या या माध्यमावर व्हायरल झालेल्या कहाण्या व अनुभव ऐकले तर कोणत्याही माणसाचे हृदय हेलावून जाते. खरेतर जनतेचे हे दुखणे चव्हाट्यावर आणण्याची जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या वर्तमानपत्रांची आहे. ज्या सोलापूर शहरात कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपल्या लेखणीने जाहीर फटके मारणारे, रंगाअण्णा वैद्य, बाबुराव जक्कल यासारखे पत्रकार महर्षी होऊन गेले त्या शहरातील पत्रकारांच्या लेखण्या आता बोथट का झाल्या आहेत?
टीव्हीच्या मराठी वाहिन्या वर सध्या रात्रंदिवस करोनाच्या बातम्या सुरू आहेत.लहानसहान गावातल्या बातम्या सुद्धा सविस्तर दाखवल्या जातात.पण सोलापूरची बातमी कधीही पाहायला मिळत नाही. सोलापूर हे रुग्णांच्या संख्येत मुंबई, पुणे, औरंगाबाद नंतर चौथे शहर असूनही सोलापूरकडे दुर्लक्ष का, सोलापूरच्या पत्रकारांनी या वाहिन्यावर सोलापूरची ‘सत्यस्थिती’ उजेडात आणली असती तर, मुंबईत बसलेल्या शासनाला त्याची दखल घ्यावी लागली असती.
समाजात ज्या वेळी अराजका सारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याची दखल प्रथम राजकीय नेत्यांनी घेणे आवश्यक असते.पण या बाबतीत तर सर्व सामसूमच आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यपाल व केंद्रीय मंत्रीपदे भूषविलेले राष्ट्रीय नेते मा.सुशील कुमार शिंदे,माजी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे नेते मा.विजयसिंह मोहिते पाटील सहकार क्षेत्रातले धुरंधर माजी मंत्री सुभाष देशमुख माजी मंत्री विजयकुमार देशमुख व जिल्ह्यातील वर्षानुवर्षे मंत्रिपदे व अनेक सत्तापदे उपभोगलेले कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारे तालुका पातळीवरील नेते कुठे गायब झाले आहेत? सर्वजण मुग गिळुन गप्प का आहेत? हे समजत नाही.
जिल्ह्याच्या सरकारी यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी, कर्मचारी आहेत. पण त्यांच्याही काही अडचणी आहेत. या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ उभे केले तर त्या अडचणी सुटू शकतात. रेल्वेने डब्यात बदल करून साडेतीन लाख आयसोलेशन बेड तयार केले आहेत.त्याचा लाभ सोलापूरला का मिळू शकत नाही अधिकारी पातळीवर हे होणे शक्य नाही.नेत्यांनी प्रयत्न केला तर हे शक्य होऊ शकते.
राज्यात व केंद्रात या नेत्यांचे भरपूर वजन व वर्चस्व आहे. अधिकाऱ्यावर वचक आहे.या नेत्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगी तरी आपल्या राजकीय दबदब्याचा वापर करून जनतेची ची पीडा दूर करावी. राजकीय वर्चस्वाचा वापर कायम स्वार्थासाठी,स्वतःच्या संस्थेसाठी आणि कार्यकर्त्यांच्या खाजगी कामासाठीच करायचा असतो काय ? जनसेवेचा वसा घेतलेली सर्वच राजकीय मंडळी इतकी हृदयशून्य कशी काय झाली आहेत, याचे आश्चर्य वाटते.
योगायोगाने आज अशी राजकीय स्थिती आहे की, जिल्ह्यात एकूण जेवढे नेते आहेत त्यापैकी निम्मे केंद्रात सत्तेत आहेत तर निम्मे राज्यात सत्तेत आहेत. दोन्ही ही गटातील नेत्यांनी मनावर घेतले तर केंद्र व राज्य सरकारद्वारे सगळ्या अडचणी चुटकीसरशी सुटतील आणि या महामारीत वैद्यकीय सुविधा अभावी बळी पडत असलेल्या जनतेचे प्राण वाचतील. या नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व या नेत्यांच्या इशाऱ्यावर मतदान करणाऱ्या लोकांनी या नेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची वेळ आता आली आहे.
शेखर गजभार
मो.9822359694