Latest Marathi News

BREAKING NEWS

दूरदृष्टीचा राजा, ज्याने आपल्या चोपदाराला बनवले हॉटेल व्यावसायिक

0

कोल्हापूर : लोकशाही भिमुख राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची ओळख जगभरात आहे, त्यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक सामतेचा पुरस्कार केला वेळ प्रसंगी प्रस्थापित रूढी परंपरांना मोडीत काढत अनेक नवे पायंडे देखील पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाले तेंव्हा शाहू महाराजांनी स्वतः त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले होते. अस्पृश्य म्हणून हिणवले जाणाऱ्या गंगाधर कांबळे यांना टाऊन हॉल चौकात हॉटेल काढून दिले. त्यांच्या शासनकाळात प्लेगची साथ पसरली असताना केलेले काम उल्लेखनीय आहे. अस्पृश्यतेविरोधात केलेल्या कामामुळे शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक संबोधले जाते. म्हणूनच यशवंतरावांपासून शरद पवारांपर्यंतचे दिग्गज नेते आपल्या भाषणात कायम ‘शाहू – फुले – आंबेडकर’ यांचे नाव घेतात.

छत्रपती शाहू महाराज जसे उत्तम प्रशासक होते तितकेच दूरदृष्टीचे राजे होते. आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने जगासोबत चाललं पाहिजे ही त्यांची भावना. अशीच एक आठवण कोल्हापूरचे अरविंद उर्फ अरुण यशवंत भोसले यांनी सांगितली आहे

अरुण भोसले सांगतात की, त्यांचे आजोबा ‘गणपत कृष्णाजी भोसले’ हे शाहू महाराजांच्या दरबारात चोपदार होते. शाहू महाराज एकदा दिल्लीला गेले असता एका हॉटेलमध्ये त्यांना जायचे होते, त्या हॉटेलची कमान लहान होती आणि महाराजांना वाकून जावे लागले असते, आपला राजा वाकून जाता कामा नये आणि दिल्लीत तर नाहीच नाही, या भावनेने गणपतराव भोसलेंनी ती कमान हटवायला लावली आणि सांगितले की आमच्या छत्रपतींना वाकायला लागत असेल तर हा त्यांचा अपमान आहे.

पुढे शाहू महाराज अमेरिकेला गेले असता, एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले, तेथील चहाची चव तो देण्याची पद्धत पाहून महाराजांना आपल्याकडे देखील असं हॉटेल असायला हवं अशी कल्पना सुचली. त्यावेळी भारतामध्ये हॉटेलिंग हे नाव देखील नव्हते, शाहू महाराजांनी येणाऱ्या काळाच्या पाऊल खुणांना ओळखले आणि माघारी येताच तत्काळ चोपदार गणपतराव भोसले यांना कोल्हापुरातील शिवाजी चौकात चहाचे हॉटेल सुरु करायला सांगितले. वरती नमूद केल्याप्रमाणे तत्कालीन लोकांना बाहेर जाऊन खाणे-पिणे माहीतच नव्हते. त्यामुळे सुरुवातीला हॉटेलमध्ये कोणीच येत नसायचं, गणपतरावांच्या पत्नीने काहीकाळ घरातून डब्बा सुरु केला, पुढे तुपातील कांदाभजी आणि जिलेबी सुरु केली. तरीही लोकांचा गणपतरावांच्या हॉटेलला अल्प प्रतिसाद राहीला.

वरील सर्व हकीगत शाहू महाराजांच्या कानावर घालताच त्यांनी आपल्या तालमीतील पैलवानांना व्यायाम झाल्यानंतर गणपतरावांच्या हॉटेलमध्ये येण्यास सांगितलं. अंग मेहनत करून पैलवान हॉटेलमध्ये पोहोचले, स्वतः महाराज आणि पैलवानांनी तुपातील कांदाभजी आणि जिलेबी वर ताव मारला. पुढे आपसूकच हॉटेलला ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. ही सर्व घटना पाहता छत्रपती शाहू महाराज हे केवळ शासकच नाही तर एक उत्तम मॅनेजमेंट गुरु देखील होते, हे दिसून येते.

आज गणपतराव भोसलेंची चौथी पिढी हा हॉटेल व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहे. अरुण भोसले अभिमानाने सांगतात की, आमचे भोसले आडनाव असूनही आजही कोल्हापूरकर ‘चोपदार’ म्हणूनच उल्लेखतात. भोसले कुटुंबातील पाच भावंड एकत्र राहतात. कुठलाही वाद नाही की कुरबुर नाही. हीच तर खरी आपल्या राजाची शिकवण आहे. शिवाजी चौकात असणाऱ्या या होटेलच नाव म्हणजे “हॉटेल चोपदार” १९१६ साली स्थापन झालेल्या या हॉटेलने १०३ वर्ष पूर्ण केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.