सोलापूर : संकटाच्या पार्श्वभूमीवर आता बळीराजा ही ऊस शेतीच्या मागे न धावता नव्या वाटा शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतात करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांनी जवळपास एक हजार एकर क्षेत्रावर अद्रक (आले)या पिकाची लागवड केली आहे. पिकाच्या लागवडीसाठी एकरी दीड लाख रुपये खर्च येत असला तरी या खर्चाची जोखीम उचलत शेतकऱ्यांनी आल्याची लागवड केली. एक एकर आले लावण्यासाठी साधारणतः सातशे ते आठशे किलो बेणे लागते. त्याचा दर पन्नास रुपये प्रति किलो आहे. शेणखत खत, मजुरी, ठिबक सिंचन यासाठी सत्तर ते ऐंशी हजार खर्च येतो. एवढ्या मोठ्या खर्चाची तयारी करून शेतकऱ्यांनी करमाळ्यात आल्याचा प्रयोग केला आहे. सालसे, घोटी, मांगी हिवरवाडी या भागातील शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. दहा ते बारा महिन्यात एकरी दहा ते बारा टन उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ऊस घालवण्यासाठी कारखानदारांकडे खेटे घालण्यापेक्षा दुसरी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेतकरी आता केळी कांदा आद्रक हळद सागवान बांबू फळभाज्या भुईमूग शेंगा अशाच पिके घेण्याकडे वळत आहेत.
याबाबत बोलताना सुजित बागल म्हणाले की, मी एक एकर क्षेत्रावर अद्रक लागवड केली आहे. आता बांबू लावत आहे ठिबक सिंचनवर तूर केली आहे.नगदी पिके करून कमी क्षेत्रात जास्त उत्पादन काढण्याचे माझे नियोजन आहे. एकरी दहा टन अद्रक चे उत्पादन घेऊन किमान सात ते आठ लाख रुपये मला बारा महिन्यात उत्पादन मिळेल अशी मला अपेक्षा आहे्. याबाबत बोलताना कोळगाव शेतकरी नागेश चेंडगे म्हणाले की, ऊस पीक चांगले आहे मात्र कारखानदारांच्या त्रासाला कंटाळून मी आता भुईमूग उडीद व मका ची लागवड केली आहे.
तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखाने बंद असल्यामुळे खाजगी साखर कारखाने वाले शेतकऱ्यांना वेठिला धरणार आहेत यामुळे आता शेतकऱ्यांनी हळूहळू दुसरी नगदी पिके घ्यावीत असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते अण्णासाहेब सुपनवर यांनी केले आहे
दिनेश मडके