Latest Marathi News

BREAKING NEWS

“संभाजी भिडे जर फडणवीसांचे गुरुजी असतील तर…”,भास्कर जाधवांचं थेट वक्तव्य

0

काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी उर्फ ​​मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना लक्ष्य करत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलनं केली. या परिस्थितीला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान या प्रकरणाला संबोधित केले, जिथे त्यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विधान केले.

हेही वाचा :देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत संभाजी भिडेंना गुरुजी संबोधल्याबद्दल उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

हेही वाचा :वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विधानसभेच्या सभागृहात निवेदन सादर करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंचा वारंवार ‘भिडे गुरुजी’ असा उल्लेख केला. मात्र, यावर सभागृहात उपस्थित विरोधकांनी आक्षेप घेतला. या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “आम्हाला ते गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे.” देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहातील या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा :विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना गुरुजी संबोधल्याने विरोधक आक्रमक

सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव म्हणाले, “भिडेंनी केलेल्या वक्तव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. या निवेदनात फडणवीस म्हणाले, अशाप्रकारे राष्ट्रपित्याचा कुणीही अपमान केलेलं आम्ही सहन करणार नाही. दुसऱ्या बाजुला ते म्हणाले, संभाजी भिडे हे आमचे गुरुजी आहेत. याचा अर्थ त्यांनी गुरुजींकडून शिक्षा घेतलीय. गुरुजींनी दिलेला धडा राजकर्ते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. संभाजी भिडे जर त्यांचे गुरुजी असतील तर याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं की, भिडेंना त्यांनीच बोलायला भाग पाडलं. ते आम्हाला मान्य आहे, असाच त्याचा अर्थ होतो.”

Leave A Reply

Your email address will not be published.