मुंबई |
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं म्हटलं होतं. लाड यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनीही लाड यांच्या या विधानाचा समाचार घेतला.
कर्नाटकाच्या आरेरावी विरोधात भाजप फक्त आरेला कारे देण्याची भाषा करत आहेत. तिकडे कर्नाटक महाराष्ट्रात घुसले आहे. भाजप फक्त इशारे देत आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावरच आहे. तुम्हाला उद्यापर्यंत कळेल विरोधक काय करतात ते, असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. त्यामुळे उद्या विरोधी पक्षाकडून कोणता मोठा निर्णय जाहीर होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण प्रसाद लाड ? सोड रे… ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपमधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नवीन भाष्य करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतू माधव पगडी किंवा इतिहासकार यदुनाथ सरकार आहेत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
या भाजपचं डोकं फिरलंय. शिवाजी महाराजांची शक्ती आहे ना, ही शक्तीच यांना खतम करेल. जी भवानी तलवार आहे महाराजांची ही तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटेल. रोज कोणी तरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला वाटतं, यांच्या स्वप्नात अफझल खान आणि औरंगजेब येत असेल आणि यांच्या कानात एक मंत्र देत असेल. त्यामुळेच हे लोक बरळत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे?
महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यांचं महानिर्वाण कुठे झालं? हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहीत आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. रायगडावर त्यांची समाधी आहे. तुम्ही नवीन नवीन शोध का लावत आहात? भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे का? असा सवालही त्यांनी केला. राज्यपालांना हटवण्याबाबत राष्ट्रपती काही करणार नाही. ते फक्त पत्राची पोच देतात. कारवाई पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीच करायला हवी. सध्या सर्व संस्थांची अवस्था सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राची जनता हीच ताकद आहे.