पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सहाव्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले. या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे मत व्यक्त केले की, आषाढी वारी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या वारकरी तथा शेतकरी बांधवांना या महोत्सवाचा नक्कीच लाभ होईल. महोत्सवाच्या आयोजनामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आणि जिल्हा कृषी अधिकारी आणि राज्यभरातून आलेले असंख्य शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात असे सांगितले की, सरकार शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच तत्पर आहे. पीएम किसान सन्मान निधीमध्ये ६ हजारांची भर घालून १२ हजार रुपये देणे, १ रुपयात पीक विमा उपलब्ध करणे, एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत करणे, सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती समजून मदत करणे अशा विविध उपाययोजनांची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.