Latest Marathi News

BREAKING NEWS

ग्रामपंचायतीची सभा घेण्यास टाळाटाळ करणे पडले महागात; शिंदे गटाच्या अपक्षेपानंतर बागल यांचे सरपंचपद गेले

0

करमाळा |

ग्रामपंचायतीची मासिक सभा घेण्यास टाळाटाळ करणे सरपंचाला चांगलेच महागात पडले आहे. वेळेत सभा न घेतल्याचा आरोप करत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मांगीच्या सरपंच निर्मला बागल यांचे पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल यांनी केलेल्या या तक्रारीवरून हे पद रद्द झाले असल्याने बागल गटाला हा दणका मानला जात आहे.

मांगीच्या सरपंच निर्मला दत्तात्रय बागल यांच्याविरुद्ध आमदार शिंदे समर्थक ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल, स्नेहल अवचर, शहाबाई नरसाळे व चतुराबाई शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत तक्रार केली होती. ‘तब्बल दीड वर्षे ग्रामपंचायतीची सभा घेण्यास कसूर’ केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता.

सुनावणी दरम्यान ॲड. वीर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी व योग्य न्यायनिवाडे सादर केले. त्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बागल गटाचे ५ तर शिंदे गटाचे ४ सदस्य विजयी झाले होते. याप्रकरणात ॲड. कमलाकर वीर व सरपंच निर्मला बागल यांच्या वतीने ॲड. नानासाहेब शिंदे यांनी काम पाहीले.

Leave A Reply

Your email address will not be published.