Latest Marathi News

BREAKING NEWS

विकासाचा ध्यास असलेल्या मातृभूमी सारख्या संस्था प्रत्येक तालुक्यात निर्माण व्हायला हव्यात : दळवी

0

बार्शी |

शहराच्या विकासाचा वेग वाढलाय. शहरे बदलताहेत. सरकार शहराच्या विकासाचे आराखडे तयार करत आहेत. पुढील १५ वर्षात देशातील सर्व शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाची होतील. या देशात ६ लाख ४८ हजार खेडी आहेत. पण या गावांचा सर्वांगीण विकास कधी होणार ? त्यासाठी गावातील अधिकारी, व्यावसायिक, नागरिक, संस्था या सर्वांनी आपआपल्या गावांच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मातृभूमी प्रतिष्ठानचे मॉडेल हे प्रत्येक गावामध्ये राबवले पाहिजे. त्यासाठी आपल्या गाव, शहराच्या विकासाचा ध्यास असलेल्या मातृभूमी सारख्या सेवाभावी संस्था प्रत्येक तालुक्यात निर्माण व्हायला हव्यात असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी अध्यक्षीय मनोगतात केले.

येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शासनाच्या उच्चपदी पदोन्नती व नेमणूक मिळालेल्या बार्शीच्या सुपुत्रांच्या नागरी सत्कार सोहळयात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यासह सत्कारमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. परंतु वेळ हे मानसिक बंधन आहे. ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो. त्या भूमीसाठी काम करण्याची, दायित्वाची भावना असेल तर वेळ मिळू शकतो असे सांगत मातृभूमी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत या संस्थेचे कार्य नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार काढले.

प्रास्ताविकात सहआयुक्त साखर संतोष डुरे-पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व मातृभूमीचे आपण देणे लागतो या भावनेतून काम करणाऱ्यांनी एकत्र येवून मातृभूमी प्रतिष्ठानची २०१४ मध्ये स्थापना केली. ८ वर्षात विविध उपक्रम राबवले. संस्थेने २१ एकर जागा लोकवर्गणीतून घेतली असून येथे स्पेशल नेत्र रूग्णालय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्र, अध्यात्मिक सेंटर, स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी करिअर अॅकॅडमी उभारण्याचा मानस असल्याचे सांगितले. राज्यात सर्वाधिक अधिकारी सोलापूर जिल्हयातील व त्यात बार्शी तालुक्यातील असल्याचे अभिमानाने नमूद करत बार्शीतील अधिकारी यांच्यामुळे बार्शीचा राज्यभर नावलौकिक असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव व्यंकटेश भट, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव संतोष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष विनय संघवी, सचिव प्रताप जगदाळे, अजित कुंकुलोळ यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा सत्कार केला. आभार किरण गाढवे यांनी मानले. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे संचालक, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

या मान्यवरांचा झाला सन्मान

मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव व्यंकटेश भट, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव संतोष पाटील, सहआयुक्त राज्यकर जीएसटी प्रकाश शेळके, सिडको नवी मुंबई येथील वित्त व लेखा संचालक धनराज गरड, राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचे विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश सोलवट, सार्व.आ.विभाग अवर सचिव सुनिल उकिरडे, सहकार संस्था दुग्ध सहनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे या बार्शी शहर व तालुक्यातील उच्चपदावरी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यावेळी शाल, पुष्पगुच्छ व ग्रामदैवत भगवंताची प्रतिमा देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मान्यवरांकडून जगदाळे मामांच्या कार्याचा गौरव

कर्मवीर जगदाळे मामा यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याचा मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला. राज्यात उच्च पदावर कार्यरत असणारे अनेकजण या संस्थेचे विदयार्थी असल्याचे मान्यवरांनी अभिमानाने नमूद केले. मातृभूमी प्रतिष्ठानने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

आणखी १ कोटीची गरज, योगदानासाठी देणगीदारांनी पुढे यावे : सोलवट

विरोधी पक्षनेत्यांचे ओएसडी अविनाश सोलवट म्हणाले, मातृभूमीचे रोपटे वाढत आहे. लोकवर्गणीतून साडेतीन कोटी जमले आहेत. त्या माध्यमातून लोकोपयोगी काम उभे करायचे आहे. अजून १ कोटी रूपयांची गरज आहे. यासाठी नागरिकांनी योगदान दयावे असे आवाहन करत यातून उभारलेल्या कामाचा पुढील पिढीला लाभ होईल असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.