बार्शी |
दि.४ डिसेंबर २०२२,रविवार रोजी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित नागनाथ हायस्कूल घारी इयत्ता दहावी सन १९९८-९९ बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २३ वर्षानंतर एकत्र आले औचित्य होते.
माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे शाळेतील मस्ती, एकत्रित केलेला अभ्यास, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शाळेतील मस्ती- दंगा, वर्गात घातलेला धुडगूस शाळेची बेल ,गृहपाठाच्या वह्या, प्रार्थनेची वेळ, शिक्षकांचा मार, रात्र अभ्यासिका , दुपारच्या जेवणाचे डबे ,मधल्या सुट्टीत पळून जाणे ,असे एक ना अनेक आठवणीचे कप्पे तब्बल २३ वर्षानंतर उघडून माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकाने केलेली शिक्षा,सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयावर गप्पा मारून विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात आपण सर्वजण एवढे मोठे झालो हे विसरून गेले होते. २३ वर्षानंतर भेटल्याचा आनंद व उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येक जण भावुक झाला होता. एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले होते.सर्वांचे डोळे आनंदाने व जुन्या आठवणीने पाणावले होते …प्रत्येकाचा चेहरा आपण खूप काही कमावल्याचं सांगत होता.
स्नेह मेळाव्याची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा पार पडला. गुरुजनांना भेटवस्तू देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. १९९८-९९ बॅच मधील दिवंगत वर्गमित्र व मैत्रिणीना तसेच दिवंगत शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, माजी विद्यार्थी परिचय व मनोगत ,गुरुजनांचे मनोगत ,स्नेहभोजन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते यावेळी माजी विद्यार्थ्याकडून प्रशालेस स्नेहभेट देण्यात आली .
शेवटी निरोप घेताना आपण पुन्हा भेटू पुन्हा एकत्र येऊ ..असेच भेटत राहू.. फोन करा ..संपर्कात रहा.. अशा भावूक शब्दात प्रत्येक जण जड पावलाने व अंतकरणाने शाळेकडे परत -परत पाहत निरोप घेत होता परत एकदा अशाच अविस्मरणीय भेटीसाठी.
यावेळी माजी विध्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. आदरणीय काकडे सर,घावटे सर,जाधवर सर,पाटील सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांविषयी असलेला जिव्हाळा,आपुलकी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव बेणे यांनी आपल्या मनोगतात शाळेतील भौतिक सुविधा आपल्या सर्वांच्या सहकार्याने उपलब्ध करत आहोत विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक वैभव बेणे, प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशव काकडे, चंद्रकांत घावटे तसेच श्री येमाईदेवी विद्या मंदिर कोरफळे चे मुख्याध्यापक श्री.जाधवर सर ,सेवानिवृत्त शिक्षक श्री.डी. एस पाटील सर,श्री पुजारी सर,श्री राऊत गुरुजी,श्री. पाटील सर,मेटकरी सर,सांगोलकर मॅडम,मसुते सर,विलास जमदाडे, व सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा जगदाळे व स्मिता जमदाडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माजी विध्यार्थी सचिन गिड्डे ,अभिजीत कदम, दीपक गोरे, तुषार वाणी ,दत्तात्रय खटावकर, शिवशंकर जगदाळे ,सयाजी लोखंडे यांनी परिश्रम घेतले.