मुंबई : निसर्ग चक्रीवादळा’ने महाराष्ट्रात मोठे नुकसान केले आहे. कोकणात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केले आहेत. तसेच कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.
राज्यात वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेच तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.