आळंदीच्या विकासासाठी २५ कोटीचा निधी लवकरच उपलब्ध करून देणार ; चंद्रकांतदादांनी घेतले माऊलीच्या समाधीचे दर्शन
पुणे |
पुण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली. आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या. आराखड्यातील कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल) वारीसाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीत येतात. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जगणाऱ्या वारकऱ्यांची भेट होईल म्हणून आपण आळंदीत आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव आदी उपस्थित होते.