कानपूर: कुख्यात मोस्ट वांटेड गुंड विकास दुबेचा खात्मा करण्यात युपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सला यश आले आहे. दुबेला कानपूरला नेताना एसटीएफच्या ताफ्यातील वाहन उलटले. अपघाताचा गैरफायदा घेऊन बंदुकीसह पळ काढणाऱ्या दुबेचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला काल अटक करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस त्याला कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान झालेल्या चकमकीत त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.
दरम्यान, दुबेला अटक करण्यात आल्यानंतर त्याने खळबळजनक माहिती दिली. आम्हाला सकाळी पोलिस येणार आहेत, याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिस रात्रीच पोहोचले. आम्हाला भीती होती की, पोलिस एन्काऊंटर करतील, पोलिसांच्या हत्येनंतर तो पोलिसांचे मृतदेह जाळू इच्छित होता. पोलिसांचे मृतदेह जाळण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. त्यासाठी तेल देखील आणले होते. विकासनं पोलिसांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले आहे.