थेट राष्ट्रपतींकडून नियुक्ती, इतिहासकार मिनाक्षी जैन यांनाही संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि कसाबला फासावर लटकावण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे. सरकारी अधिसूचनेद्वारे रविवारी ही घोषणा करण्यात आली. यासोबतच केरळचे सदानंद मास्टर आणि इतिहासकार मिनाक्षी जैन यांचीही राज्यसभेवर निवड झाली आहे.
१९८४ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांनी यापूर्वी बांगलादेशातील उच्चायुक्तांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. ते जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ पर्यंत परराष्ट्र सचिव होते. कोविड-१९ साथीच्या काळात भारताच्या राजनैतिक क्षेत्रात नेव्हिगेट करत होते. उज्वल निकम हे २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या अजमल कसाब खटल्यासह आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक उच्च-प्रोफाइल प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले. त्यांच्या दशकांच्या कायदेशीर कारकिर्दीत निकम यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले. संविधानाच्या कलम ८० अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकने केली आहेत, जी साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यास परवानगी देते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधान राष्ट्रभक्तांच्या मागे उभे राहतात हे यातून दिसून आले. उज्वल निकम यांचे ही अभिनंदन करतो. भविष्यातही ते देशाच्या संसदेपासून न्यायालयापर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेने अशाच प्रकारे देशाच्या शत्रूंशी लढत राहतील, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
लोकसभेत पराभव, राज्यसभेत संधी
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर भाजपने निकम यांना राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून बक्षीस दिले होते. त्यानंतर आता थेट राज्यसभेत संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी निवड झाली.