मुंबई : कंगना रानौत आणि शिवसेना वादाला आता राजकीय वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवरून भटकले आहेत. कंगना सातत्याने राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करत आहे. अशा वेळी तिचे मुंबईमधील ऑफिस पाडण्यात आले. शिवसेना सातत्याने कंगनाला टार्गेट करत आहे. त्यामुळे शिवसेना हिदुत्वाची वाट विसरली आहे असे आरोप हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहे.
अयोध्येतील धर्मगुरू परिषदेने उध्वव ठाकरे यांना अयोध्येत येण्यास बंदी घातली आहे. पालघरमधील साधूंचे हत्या प्रकरण, कंगना रानौतचे प्रकरण असेल, या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने हाताळल्या गेल्या ते पाहता, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आयोध्येत पाऊल ठेऊ नये असे उद्विग्न मत, महंत कन्हैय्या दास यांनी व्यक्त केले.
दरम्यान शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया यायच्या आत कॉंग्रेस शिवसेनेच्या मदतीला धावून आल्याचं दिसत आहे. विश्वहिंदू परिषदेने जास्त वळवळ करू नये. ते काही हिंदू धर्माचे मालक नाहीत. आपल्या अशा बोलण्याने ते भाजपला फायदा करून देत आहेत. आयोध्या काय कोणाच्या बापाची नाही किंवा कोणाच्या मालकीची नाही. अयोध्या हा प्रत्येकाच्या धार्मिक भावनेचा विषय आहे. अशी प्रतिक्रिया पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राम मंदिराच्या भूमिपुजनात विश्वहिंदू परिषदेचा किती रोल आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे असा टोला देखील वडेट्टीवार यांनी लगावला.
भाजपने देखील आता या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेला हिंदूंचा विसर पडला आहे त्यामुळे साधुसंताना तरी त्यांच्याविषयी प्रेम का वाटेल ? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार देखील शिवसेना विसरली आहे. असा घणाघात भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आता सर्व वादावर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.