रतन टाटा, सायरस पुनावाला, अमिताभ बच्चन, फारूख अब्दुल्ला, आणि वारेन बफे या सहस्त्रचंद्र दर्शनाकडे झेपावणार्यान ज्येष्ठांची दिली ऊदाहरणे !
राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या बैठकीला अजितदादांनी घेतला आक्षेप !
पक्षाचे नाव आणि चिन्ह न सोडण्याचा साहेबांचा निर्धार !
राष्ट्रवादीचा संघर्ष पोहोचला शिगेला !
अजितदादा म्हणजे पोटात आणि ओठात एक असणारा माणूस -वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची बोलकी प्रतिक्रिया !
अजितदादा आता आमच्या निधि आणि मतदार संघातल्या विकासकामांना आडवे येणार – बच्चू कडूंचा थेट प्रहार !
दादांमुळे सरकार मजबूत झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा !
मग दोन आमदारांच्या नाराजी नाट्यानंतर नागपुर दौरा का झाला रद्द ?
बार्शी (सचिन अपसिंगकर)- आमच्या जडण-घडणीत पवार साहेबांचा मोठा वाटा आहे. असे आमदारांच्या बैठकीत नूतन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच बोलले. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अगदी त्यांच्या नावाचा जय-जय कारच केला. पण बैठका संपून चोवीस तास उलटत नाहीत, तोपर्यंत अजितदादांनी स्वत:ची राष्ट्रावादीचे अध्यक्ष अशी घोषणा करणारा ठराव बैठकीत मंजूर करून घेतला. आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीयअध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या बैठकीला आक्षेप घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचा संघर्ष दिवसेंदिवस शिगेला पोहोचला असल्याचे महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी दौरे करण्याची घोषणा पवार साहेबांनी केली आहे. त्यांनी कराडमधून या दौर्यातला सुरुवात ही केली.
अजितदादा म्हणजे पक्ष नव्हे हे पवार साहेबांनी ठणकावून सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितिमध्ये पक्षाचे नाव आणी चिन्ह हातून जाऊ देणार नाही, असा ही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. साहेब जिथे जातील तिथे प्रत्युतराची सभा घेऊ असे अजितदादांनी ही सुनावले. अर्थात अजितदादांच्या पाठीशी भाजपा-शिवसेना केंद्रातील शासन उघडपणे असले तरी शरद पवार प्रणीत राष्ट्रवादीच्या मेळाव्याला सुप्रियाताईंनी देखील पदरखोचून बाहेर पडणार असे सांगत कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. त्या मेळाव्यातील सुप्रियाताईंचे भाषण अगदी ईर्षेनेच केलेलं होत. ताईंनी दमलेल्या बापाची दासू वैद्य यांनी लिहिलेली कविता ही ऐकवली पण ताईंचे बाबा दमत नाहीत, हेच त्यांच्या दादांचे खरे दुखणे आहे, हे सांगायला त्या विसरल्या. पण आपल्या बाबांच्या या वयातही लढण्याच्या वृत्तीचे ताईंनी अगदी खंबीरपणे समर्थन केले. ताईंनी उद्योगपती रतन टाटा, सायरस पुनावाला, अमिताभ बच्चन, फारूख अब्दुल्ला, वारेन बफे यांची उदाहरणे देत ऐंशी ओलांडलेल्या पवार साहेबांच्या परिश्रमाचे कौतुक केले.
शरद पवारांच्या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा करिश्मा एवढा आहे की, प्रतिपक्षाच्या बॅनरवर ही त्यांचाच फोटो लागतो, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. सुप्रियाताईंनी आता भविष्यातल्या संघर्षाची जाणीव झाली आहे. साहेबांप्रमाणेच त्यांनाही अवघा महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे. कारण पवार साहेबांबरोबरच अजितदादाही राज्यातले मोठं जनाधार असलेलं नेतृत्व आहे. त्यांचे ही कार्यकर्त्यांचे जाळे राज्याच्या कानाकोपर्यामत पसरलेले आहे. दरम्यान अजितदादांच्या सत्तासहभागामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालत झाली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना सुद्धा मुख्यमंत्रीपदी पुढचे एक वर्ष एकनाथ शिंदेच राहणार आहेत, हे जाहीर पणे सांगावे लागण्याची पाळी आली आहे. राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री शिंदेंसह सोळा आमदारांच्या कथित अपात्रता कारवाईची रसभरीत चर्चा सुरू आहे.
त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजितदादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितिमध्ये राज्यमंत्री मंडळाचा संभाव्य विस्तार दृष्टिपथामध्ये असताना अजितदादासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे शिवसेनेतील मंत्रीपदासाठी इच्छुक असणार्या आमदारांनी आपला असंतोष आणि नाराजी जाहीरपणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे. परवा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेलं सत्तासहभाग मिळणार नसेल तर सत्ता हवीच कशाला? हे वक्तव्य हवेत विरत नाही तोपर्यंत प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अजितदादांमुळे आमच्या विकासनिधिला अडथळे आणि मतदार संघाच्या कामांमध्ये हस्तक्षेप होईल अशी थेट टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यात चाललेल्या घडामोडींवर यथेच्छ तोंडसुख घेतले आहे. मात्र आंबेडकर यांनी अजितदादांचे पोटात एक आणि ओठात एक असणारा माणूस असे कौतुक ही केले आहे. राज्यात अजितदादांच्या सत्तेतल्या सहभागामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदावरच्या कथित गंडांतरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न दस्तूरखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनाच करावा लागला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अजितदादांच्या सत्तासहभागामुळे सरकार मजबूत झाले आहे, अशी पुस्ती जोडली आहे. अर्थात मुख्यमंत्री यांनी हे विधान किती मनापासून केले हे त्यांनाच माहिती.
आता राज्यात झालेल्या या मोठ्या राजकीय नाट्यानंतर राज्याच्या विविध भागात जिथे भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी आहे, अशा ठिकाणी भाजपाच्या नेत्यांमध्ये चांगलेच चलबिचल सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील नुकतेच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या हसन मुश्रीफ यांचे विरोधक मानले जाणारे भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे यांची खुद्द उपमुख्यमंत्र्यांना समजूत घालावी लागल्याचं वृत्त कानावर येत आहे.
एकंदरीत काय तर अजितदादांनी केलेलं बंड हे एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षाही जास्त चर्चेचा विषय झाला आहे. आगामी काही दिवसात राष्ट्रवादीचे किती आमदार कोणाच्या पाठीशी राहणार याच चित्र स्पष्ट होणार आहे. आपण जे बोललो ते खोटे असेल तर पवाराची औलाद नाही, अशी स्पष्टोक्ती करत अजितदादांनी सगळी घरातील भांडणे आणी पक्षातली भांडणेसुद्धा अगदी रस्त्यावर आणली आहेत. ते आपली काकांची आणखी किती गुपिते उघड करणार आहेत हे त्यांनाच माहीत आहे. पण सध्यातरी काका विरुद्ध पुतण्या यांनी एकमेकांना शड्डू ठोकला आहे एवढं मात्र खरे.