मुंबई | अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे अजित पवारांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे असे बॅनर झळकले होते अशातच आता राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्ष बंगल्यावर पोहचले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या ताकदवान नेत्या निलम गोऱ्हे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटून एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रियेत ‘या चिमन्यांनो परत फिरा’ असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली होती. त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरेंसोबत जाणार का? आणि त्याचं नेतृत्व दोन्ही ठाकरे बंधू करतील का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे हे काही वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटी होत असतात. याआधी एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. तसेच राज ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागचं खरं कारण समोर आलेलं नाही. पण आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याची चर्चा आहे