अरे बापरे, सोलापुरातील ४० कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा पत्ता चक्क दोन महिन्यांनी लागला! उद्धवजी, सोलापुरात काय चाललंय ?
राजा माने: मुंबईतील मृत्यूंच्या आकड्यावरून उठलेले वादळ शमल्यासारखे वाटत असतानाच आता सोलापुरातील कोरोना ग्रस्तांच्या मृत्यू आकड्याचे वादळ उठले आहे. सोलापूर शहरात कोरोनाने घातलेल्या मृत्यूच्या तांडवातील ४० मृत्यूंचा आकडा चक्क दोन महिन्यांनी सापडला आणि कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या २१३वर पोहोचली.
४० कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा घोळ कसा घातला गेला? त्याला जबाबदार कोण? जर मृत्यूच्या बाबतीत असा प्रकार घडत असेल तर संशयित आणि प्रत्यक्ष कोरोनाग्रस्तांबद्दल काय घडत असेल? असे असंख्य प्रश्न उभे राहतात. म्हणूनच सोलापूरकरांनी जागे व्हावे. महाराष्ट्राचे परिपक्व कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारनेही खडबडून जागे व्हावे, एवढा हा गंभीर प्रकार आहे… म्हणूनच कोणाचाही मनात सहज प्रश्न उभा राहील, तो म्हणजे.. उद्धवजी, सोलापुरात हे काय चाललंय ?
कोरोना संकटाने सोलापूर शहराला अलगदपणे आपल्या मगरमिठीत घेतल्याचे रोजची आकडेवारी सांगते आहे. कोरोनाची साखळी तोडण्यात अपयश आल्याचाच हा परिणाम आहे. त्या अपयशाचे धनी जेवढे प्रशासन आहे. तेवढेच बेफिकीर आणि बेजबाबदार सोलापूरकर देखील आहेत, हे नाकारता येणार नाही.दोनशेहून अधिक बळी पडले तरी आपण जागे होणार नाहीत का? हा प्रश्न सुज्ञ सोलापूरकरांनी स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.
महापालिकेचे जबाबदार अधिकारी आयुक्त पी शिवशंकर ४० कोरोनाग्रस्तांच्या मृत्यू आकड्यांचा लपंडाव सांगताना प्रशासनातील “कम्युनिकेशन गॅप” ची कबुली देतात. तब्बल ४० लोकांचा जीव जातो आणि दोन महिने त्याच्या नोंदीचा पत्ताच लागत नाही, हा कसला “कम्युनिकेशन गॅप”? हा तर शंभर टक्के हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणाच आहे. येथे कारणे दाखवायचे कागदीघोडे नाचवून गप्प बसणे चुकीचे ठरेल.
मृत्यूंच्या आकड्यांचा खेळ मांडणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.केवळ कारवाई होऊन या प्रकरणाचे गांभीर्य कमी होणार नाही, हेही तेवढेच खरे! कारण या प्रकरणाच्या निमित्ताने कोरोना संकटाला हाताळण्यासाठी सज्ज केलेल्या तथाकथित यंत्रणेचे पोस्टमार्टम होणे गरजेचे आहे. त्यातून निघणारे निष्कर्ष कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी नव्याने मांडणी करायला मदत करतील. नवी दिशा देतील. गेल्या चार महिन्यात सोलापूरकरांचे सर्वच आघाड्यांवर कंबरडे मोडले आहे. सर्वकही ठप्प झालेले आहे. प्रकृती ठणठणीत असली तरी जगायचे कसे,या प्रश्नाने सर्वसामान्य माणूस खचून गेलेला आहे.
एकीकडे कोरोनावर नियंत्रण येताना दिसत नाही तर दुसरीकडे ते नियंत्रण आणण्यासाठी असलेल्या प्रशासनावर लोकांचा विश्वास नाही. अशा कात्रीत सोलापूर शहर सापडले आहे. अशा दुर्दैवी काळा राजकारण करू नये, हा आदर्शवाद सर्वमान्य !पण, अशावेळी सत्ताधारी अथवा विरोधी राजकारण्यांनी हातावर हात देऊन गप्प बसणे हेही योग्य ठरणार नाही. त्यामुळे विरोधकांनी जिथे दोष दिसतील तिथे तुटून पडणे योग्य ठरणार आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ खिलाडूवृत्ती ठेवून या प्रश्नाचे राजकारण केले पाहिजे. ज्याचा उपयोग कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी होईल.
आकडेवारी घोळाच्या निमित्ताने एकूण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याबरोबरघ स्वतःही सजग आणि तत्पर राहण्याची गरज आहे. त्याच साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आली आहे.