राज्यात घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींसंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याने भाजप नेत्यांकडून अनेक कमेंट केल्या जात आहेत. यावर आता काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण विधान केलं आहे.
शिवसेनेचे काही आमदार नाराज असले तरी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेनेचा अंतर्गत विषय लवकरच सुटेल असा विश्वास असल्याचं शरद पवार म्हणाले. यावेळी महाविकास आघाडी सरकार कोसळलं तर भाजपाला पाठिंबा देणार का असं विचारलं असताना शरद पवार यांची प्रतिक्रिया खूप सूचक ठरली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार आहेत आणि त्यांची नाराजी दूर झाली नाही तर सरकार कोसळू शकतं. सरकार कोसळलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाशी संपर्क साधणार का? असं शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी प्रश्नावरच आक्षेप घेतला. “तुम्ही असा प्रश्नच कसा विचारू शकता? आम्ही विरोधी बाकावरही बसू शकतो”, असं शरद पवार म्हणाले.