नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध मोठे बंड पुकारले असून शिंदे यांनी शिवसेनेचे 35 आमदार फोडले आहे. त्यानंतर राज्य सरकार अस्थिर होण्याची परिस्थिती ओढवलेली आहे. यावरच आता रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ”महाराष्ट्रातून उद्धव सरकार जाण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान आठवले यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35-36 आमदार आहेत. शिवसेनेच्या लोकांनी भाजपसोबत सरकार स्थापन करू, असे सांगितले, मात्र तसे न झाल्याने शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्यांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होणार आहे.” उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका करताना म्हणाले की, ”राज्य सरकारने विकासकामे करण्याऐवजी केवळ भाजपवर आरोप करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात कुठेही विकास झालेला नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासारखे मोठे नेते आहेत, या नेत्यांना आमदारांचाही पाठिंबा आहे. एकनाथ दोनतृतीयांशहून अधिक असंतुष्ट आमदारांसह आले तर त्यांच्या सदस्यत्वावर कोणताही परिणाम होणार नाही.
मी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार असल्याचे आठवले म्हणाले. अडीच वर्षाचा फॉर्म्युला चालणार नाही, असे मी उद्धव यांना सांगितले. भाजपनेही त्यांना हेच सांगितले होते. पण शिवसेना अडीच वर्षांच्या मागणीवर ठाम होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी शिंदे हे किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे ते म्हणाले.