Latest Marathi News

BREAKING NEWS

विकास दुबेचा एनकाउंटर हा पोलिसांनी घेतलेला सूड – संजय राऊत

0

मुंबई : विकास दुबेच्या एनकाउंटरनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. प्रियांका गांधी यांनी त्याला अटक झाल्यावरच प्रतिक्रिया दिली होती की ही सरकारची मिलीभगत आहे. आज सकाळी पळून जात असताना विकास दुबेचा एनकाउंटर झाला. यावर अखिलेश यादव यांनी गाडी पलटली नसती तर सरकार पलटले असते अशी खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांनी विकास दुबेचा एनकाउंटर हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचे म्हटले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले. कोणत्याही प्रकारे एनकाउंटरचे राजकारण होता कामा नये, यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होते. संपूर्ण राज्यावर आणि पोलीस विभागावर नामुष्की येऊ नये, तसेच आपल्या ७ सहकाऱ्यांच्या खुनाचा सूड म्हणून त्यांनी हा एनकाउंटर केला असल्याचे राऊत म्हणाले. अनेक गौप्यस्पोट होतील या भीतीने एनकाउंटर केला का ? असे विचारले असता, यावर राऊत म्हणाले की, “मला असं वाटत नाही, विकास दुबेवर पोलीस ठाण्यात हत्या करण्याचे आरोप आहेत, कित्येक घटना या आधीच्या सरकारच्या काळात घडल्या आहेत. त्यामुळे फक्त योगी सरकारवर याचा आरोप ठेवणे योग्य नाही.

विकास दुबेच्या घरातील कित्येक जणांची राजकीय पार्श्वभूमी आहे, स्वतः दुबेचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध होते. त्यामुळे राजकारण करून पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करू नये असे देखील राऊत म्हणाले आहेत. दरम्यान नितीश कुमारांनी देखील सांभाळून आरोप करावेत असा सल्लादेखील राऊत यांनी दिला.

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला काल अटक करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस त्याला कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान झालेल्या चकमकीत त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.

दरम्यान, दुबेला अटक करण्यात आल्यानंतर त्याने खळबळजनक माहिती दिली. आम्हाला सकाळी पोलिस येणार आहेत, याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिस रात्रीच पोहोचले. आम्हाला भीती होती की, पोलिस एन्काऊंटर करतील, पोलिसांच्या हत्येनंतर तो पोलिसांचे मृतदेह जाळू इच्छित होता. पोलिसांचे मृतदेह जाळण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. त्यासाठी तेल देखील आणले होते. विकासनं पोलिसांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.