नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्र सरकारवर टीकेची कोणतीही संधी सोडत नाहीत. कोरोना आणि अर्थव्यवस्था या बाबतीत त्यांचा रोख आणखी तिखट असतो. शुक्रवारी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांनीदेखील कोरोना अधिक चांगला हाताळला, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
‘ भाजप सरकारद्वारे मिळवलेली अजून एक उपलब्धी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारताच्या तुलनेत कोविड -१९ चे संकट अधिक चांगल्या प्रकारे हाताळले आहे. असा उपरोधक टोला केंद्र सरकारला राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून मारला आहे. आयएमएफ द्वारे प्रदर्शित केलेल्या एका ग्राफचा आधार घेत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यामध्ये जीडीपीमध्ये 10.30 अंकांची घट होणार असल्याचे देखील म्हटले आहे.
आयएमएफ रिपोर्टने भारतीयांच्या चिंतेत वाढ केलेली आहे. त्यांच्या अहवालानुसार 2020 – 21 या वित्तीय वर्षात जीडीपी 10 अंशांनी खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे. भारताची जीडीपी ग्रोथ बांग्लादेशपेक्षा ही कमी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आयएमएफ ने या आठवड्यात प्रदर्शित केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्टनुसार, भारत दक्षिण आशियातील तिसरा सगळ्यात जास्त गरीब देश बनण्याच्या मार्गावर आहे. जीडीपी च्या सद्य आकडेवारीवर नजर टाकल्यास फक्त नेपाळ आणि पाकिस्तानचा भारताच्या मागे आहेत. बांग्लादेश, भूटान, श्रीलंका आणि मालदीव हे देश भारताच्या पुढे असतील. मात्र रिपोर्टमध्ये असेही सांगितले आहे की, 2021 मध्ये 8.8 वृद्धी दर राहिल्यास भारत आशिया खंडातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकते.
Another solid achievement by the BJP government.
Even Pakistan and Afghanistan handled Covid better than India. pic.twitter.com/C2kILrvWUG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 16, 2020