पंढरपूर |
आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली. विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठुनामाचा गजर सुरू केला.

यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या दाम्पत्यास मानाच्या वारकरीचा मान मिळाला. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक या दांपत्यासह शासकीय पूजा केली.
काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. त्यांना देखील नमन करून त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे अशी मनोकामना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.