Latest Marathi News

BREAKING NEWS

मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठं केलं; सामनातून ठाकरे गटाने साधला निशाणा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांच्या इंडिया आघाडीचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांची इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. आघाडीच्या प्रत्येक नेत्याला पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. याला आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. “मोदींनी त्यांच्या भाषणाने काँग्रेसला मोठे केले. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे त्यांच्या भाषणाने नक्की केले. ते सूर्याचे मालक नाहीत” असं म्हणत निशाणा साधला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि नरेंद्र मोदींवर मणिपूरवरून हल्लाबोल करण्यात आला आहे. “मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत? मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय? महिलांची नग्न धिंड वारंवार काढली जात असताना पंतप्रधान मोदींच्या भावना गोठून का गेल्या होत्या?” असे संतप्त सवाल सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीका करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले. ‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले. दोनेक तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत. पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण, काँग्रेसचे स्वातंत्र्य लढय़ातील कार्य या मोदींच्या यातना आहेत व दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांतून दूर होऊ शकलेले नाहीत.

मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत? मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जात असताना मोदी पंतप्रधान आहेत व लोक मोदींना जाब विचारीत आहेत. यात नेहरूंचा दोष काय? आता मोदी म्हणतात, मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय?

अविश्वास ठरावाच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले व सत्ता पक्षाची चिडचिड अनुभवता आली. संसदेतून बाहेर फेकलेले राहुल गांधींचे भाषण हे त्या चिडचिडीमागचे मुख्य कारण. दहा वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आज राहिलेले नाहीत. सत्यवचनी व बेडर गांधींसमोर मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे.


शहा हे मोदींची वैयक्तिक गरज म्हणून गृहमंत्रीपदी बसवले आहेत. हुकूमशहाला त्यांच्या बेकायदेशीर आदेशांची अंमलबजावणी करायला एक जवळचा अंमलदार लागतो. देशात विरोधकांवर जो दबाव, दहशतवाद सुरू आहे तो अमित शहा यांच्या हाती गृहमंत्रालय व तपास यंत्रणा असल्यामुळेच, पण हे सर्व 2024 नंतर त्यांच्या हाती राहणार नाही. हीच चिडचिड शहा आणि मोदींच्या प्रदीर्घ भाषणांतून दिसली.

2014 व 2019 असा दोन वेळा काँग्रेसचा पराभव करूनही या दोघांना 2024 साली काँग्रेसची भीती वाटते व ते काँग्रेसवरच हल्ला चढवत आहेत. हे त्यांचे मानसिक दौर्बल्य आहे. मणिपूर प्रश्नावर राजकारण न करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले. मोदी यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले. त्यात 2 तास 10 मिनिटे राजकारण व उरलेली 3 मिनिटे मणिपूर होते.

अविश्वास ठरावाच्या दरम्यान मोदी-शहा हे पूर्ण काँग्रेसमय झाल्याचे दिसून आले. मोदी यांची सर्व भाषणे साचेबंद असतात. ईशान्य भारताशी माझे स्वतःचे भावनात्मक नाते आहे. मोदी ज्या राज्यात व देशात जातात, त्या भागाशी आपले भावनात्मक नाते असल्याचे ते सांगतात. इतके भावनात्मक वगैरे नाते होतेच, तर मग मणिपुरात महिलांची नग्न धिंड वारंवार काढली जात असताना पंतप्रधान मोदींच्या भावना गोठून का गेल्या होत्या?

पुणे शहरातील चांदणी चौक परिसरात दारूच्या, बिअरच्या बॉटल लटकावून आंदोलन !

पुण्यातील चांदणी चौकाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण !

Leave A Reply

Your email address will not be published.