वारीची परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या साधू-संतांनी देव माणसात ओळखावा, त्याची सेवा करावी असं सांगून ठेवलंय. माणसातला देव ओळखत आरोग्य वारीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा उपक्रम महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हाती घेतलाय असं सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाचे कौतुक केले.
आषाढी वारी कालावधीमध्ये वारकरी महिलांना सुरक्षा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून आयोजित आरोग्य वारी उपक्रमाचा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. भवानी पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सदस्या संगीता चव्हाण, ॲड गौरी छाब्रिया, आमदार रवींद्र धंगेकर, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र विनवडे, स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वर्षानुवर्षे वारी होते आहे. दरवर्षी नव्या अडचणी, अडथळे समोर आले की त्यावर मार्ग शोधणारे ही उभे राहतात. तसचं लाखो महिला वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मार्ग शोधण्याचे आणि त्यासाठी पुढाकार घेण्याचे काम रूपाली चाकणकर यांनी केले आहे. मासिक पाळी बाबत महिलांच्या मनात संकोच असतो, समाजातही त्याबाबत आरोग्याच्या दृष्टीने बोलले जात नाही. वारी काळातही महिलांना एकदा तरी सॅनिटरी पॅडची गरज पडते. त्यामुळे ते मोफत उपलब्ध करून देणे आणि ते पर्यावरणपूरक नष्ट करण्याची व्यवस्था करणे ही आवश्यक बाब आहे. महिलांचा वारी प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी हाती घेण्यात आलेला आरोग्य वारी हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.