कोल्हापूर | करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून छेडछाड करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप पुजारी गजानन मुनीश्वर यांनी केला आहे. या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करणार, असे जिल्हाधिकार्यांनी घोषित केले होते. त्यानुसार 14 मार्च 2023 या दिवशी सकाळी 9 वाजता मूर्तीची पहाणी करण्यासाठी काही अधिकारी मंदिरात उपस्थित होते.
ही पहाणी करतांना त्यातील एका अधिकार्याने श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखावरील संवर्धनाचा लेप काढला, तसेच नाकावरचा लेपही काढला असून, मूर्तीचा चेहरा आणखी खराब केला आहे. असा गंभीर आरोप श्रीपूजक यांनी केला आहे. 18 सप्टेंबर 2022 या दिवशी किंवा त्यापूर्वी देवीच्या मूर्तीच्या मुखावर संवर्धनाचा लेप चढवण्यात आला होता.
दरम्यान, या संदर्भांतील न्यायालयामध्ये गजानन मुनीश्वर यांनी याचिका देखील दाखल केली आहे. त्यामध्ये श्रीपूजक यांनी सत्य प्रतिज्ञावर निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, ’14 मार्च 2023 या दिवशी सकाळी 9 वाजता 4 अधिकारी मूर्तीची पाहणी करण्याकरिता आले होते. यावेळी तब्बल 25 मिनिटे हे अधिकारी मंदिराच्या गाभाऱ्यात होते.
अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची पाहणी केली तेव्हा त्यातील एका अधिकाऱ्याने महालक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर केलेल्या संवर्धनाचा लेप काढला. तसेच नाकावरचा सुद्धा लेप काढला. त्यामुळे मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली असून पुढील सुनावणी 21 मार्चला होणार आहे.