मुंबई | करंट विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून सर्वच पक्षांनी दिग्गज मंडळींना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने पुन्हा सत्ता काबीज करण्यसाठी जोरदार तयारी सुरु केली असून विजयासही स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहे. अशातच भाजपचे सर्वांत मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ एप्रिलला कर्नाटकातील बेळगाव येथून त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आधीच कर्नाटकात प्रचारात व्यस्त आहेत. मंगळवार आणि बुधवारी भाजप कर्नाटकात सर्व २२४ मतदारसंघांत स्टार प्रचारकांना प्रचारात उतरविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ पासून राज्यात दौरा सुरू करणार आहेत. बेळगावमधील चिक्कोडी, कित्तूर, कुडाची या भागाचा ते दौरा करतील. त्यानंतर पंतप्रधान ३, ५ आणि ८ मे रोजी कर्नाटकमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून २५ एप्रिलला अमित शाह बागलकोट जिल्ह्यातील तेरादल, विजयपुरा जिल्ह्यातील देवरीपरागी आणि यादगिरी येथे निवडणूक सभा घेणार आहेत. यादगिरीमध्ये ते रोड शो करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील कर्नाटकातच प्रचारात व्यस्त आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह २६ एप्रिल, २९ एप्रिल, ५ मे आणि ७ मे रोजी कर्नाटकात प्रचारासाठी जाणार आहेत. या चार दिवसांत राजनाथ सिंह २० निवडणूक सभा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही कर्नाटकात पोहोचल्या आहेत.