सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विखारी टीका केली आहे. पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान वापरल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या रडारवर आले आहेत. कधीकाळी पडळकर यांचे सहकारी राहिलेले उत्तमराव जानकर यांनी देखील त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांना दगलबाज तर फडणवीस यांना भामटा म्हणता येऊ शकत, पण आमची ती संस्कृती नाही. पडळकर हे केवळ प्रसिद्धीसाठी भडक विधाने करत आहेत, अशी टीका जानकर यांनी केली आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर अन्याय केला. ते धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
दरम्यान, पडळकर यांनी केंद्र सरकारकडून ‘धनगर आणि धनगड’ ही दुरुस्ती केंद्राकडून करून आणावी, राज्य सरकारकडून त्याची अमलबजावणी करण्याच काम मी करतो. पण आजवर केवळ आश्वासन देऊन मोदी – फडणवीस यांनी धनगर समाजाशी केलेली बेईमानी मी पत्रकार परिषद घेत येत्या आठ दिवसांत मांडणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
उत्तमराव जानकर यांचे नाव धनगर आरक्षण लढ्यात आघाडीवर आहे. गोपीचंद पडळकर यांच्या सोबतीने त्यांनी ‘धनगर आरक्षण – अखेरचा लढा’ म्हणून मोठे आंदोलन छेडले होते. पडळकर – जानकर जोडीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत सभा घेतल्या होत्या. दोघांमध्ये आजवर मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत.