Latest Marathi News

BREAKING NEWS

हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबत हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल

0

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’ किंवा ‘पुनःच हरिओम’ म्हणत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. एखादी गोष्ट एकदा सुरु केली की ती परत बंद नाही करायची हे धोरण ठरवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. हॉटेल व्यवसाय कसा सुरु करता येईल यावर कार्यपद्धती निश्चित करणे सुरु असल्याचे हॉटेल्स असोसिएशनसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवासी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिमदेखील बंदच ठेवले आहेत. कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकटसमयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वयंशिस्तही महत्त्वाची – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करताना भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.