शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत भगदाड पडते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला आहे. हाॅटेल मेरेडियनमध्ये तगड्या बंदोबस्तात त्यांची बडदास्त ठेवण्यात आली आहे. अर्थातच भाजपनेच हा डाव टाकला आहे का ? अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक प्रस्ताव दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आघाडी तोडण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
तत्पूर्वी एकनाथ शिंदेबाबत थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचा नेमका कोणता नेता एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी रवाना होते, हे कळू शकलेलं नाही. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातच्या सूरतमधील एका हॉटेलात असून त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचीही माहिती आहे. एकनाथ शिंदेचं बंड थोपवण्याचं आव्हान सध्या शिवसेनेसमोर उभं ठाकलंय. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्याने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.