Latest Marathi News

BREAKING NEWS

अजितदादांच्या सत्तासहभागामुळे सोपल, बारबोलेंना हि मिळणार पाठबळ !

0

बार्शी (सचिन अपसिंगकर) :

– राष्ट्रवादीचे प्रबळ नेते अजित पवार यांनी इतर आठ आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत, काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आपल्यामागे राष्ट्रवादी पक्षातील चाळीस आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच दादांच्या मागे किती संख्याबळ आहे हे पुरते स्पष्ट होणार आहे. मात्र दादांनी घेतलेला हा निर्णय पूर्वनियोजित असल्याचे संकेत मिळत आहेत. अजितदादांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. भारतीय जनता पार्टीला आता राज्यात प्रबळ विरोधीपक्ष उरणार नसल्याचे दिसते आहे. शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या वर्चस्वाला व पक्षांतर्गत स्थानाला मोठा हादरा देण्याचे काम विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनियोजित व्यूह रचना आखून केल्याचे चित्र कालच्या राजकीय घडामोडींमुळे निर्माण झाले आहे.

राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष प्रबळ असलेल्या प्रत्येक तालुक्यात आता शरद पवार व विरोधी अजितदादा पवार यांचे गटतट निर्माण होणार आहेत. अजितदादांनी आपला सवतासुभा तयार केल्याचे उघड झाले आहे. बार्शी विधानसभा मतदार संघात देखील शरद पवार व अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत. माजीमंत्री दिलीप सोपल हे १९८० सालापासून शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना निष्ठावंत साथ देणारे समर्थक म्हणून ओळखले जात असत. १९८५ साली सोपल यांनी शरद पवार यांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चरखा या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवून जिंकली होती. १९९० साली सोपल यांनी शरद पवार यांच्या बरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करून हात या चिन्हावर विधानसभा सदस्यत्व पटकावले होते. १९९५ साली सोपल यांना राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी नाकारली गेली, तेंव्हा अपक्ष उमेदवार असलेल्या सोपल यांना उद्देशून पवार यांनी जाहीरसभेत धाकटाभाऊ असे संबोधले होते, व अप्रत्यक्षपणे सोपल यांच्या विजयास हातभार लावला होता. त्यावेळी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या सोपल यांनी विधिमंडळात शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारत अपक्षांच्या कोट्यातून बार्शी तालुक्याला पहिले राज्यमंत्रिपद खेचुन आणले होते. नंतर १९९९ साली शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्मावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली. तेंव्हा सोपल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून विधानसभेची उमेदवारी मिळवून चौथ्या वेळेस आमदारकी मिळवली होती. राष्ट्रवादीच्या चिन्हावर २००४ साली लढविलेल्या विधानसभा निवडणुकीत सोपल पराभूत झाले व राजाभाऊ राऊत निवडून आले. २००९ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये झालेल्या जागा वाटपात तत्कालीन आमदार राजाभाऊ राऊत याना काँग्रेसची उमेदवारी मिळाली व त्या निवडणुकीत सोपल दुसर्याीवेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांनी या कार्यकाळात राज्याचे पाणीपुरवठा व स्वछतामंत्रीपद भूषविले. २०१४ साली राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी मिळवून सोपल विजयी झाले. मात्र याकाळात त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. २०१९ साली मात्र पवारनिष्ठ मानले जाणाऱ्या सोपल यांनी निर्माण झालेल्या राजकीय अपरिहार्यते मुळे पवारनिष्ठेला तिलांजली दिली व त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ साली विधानसभेच्या निवडणुकीत सोपल यांचा पराभव झाला. त्या निवडणुकीत बार्शी शहरात झालेल्या सभेत पवार यांचे सोपल यांच्यावर नामोल्लेख नकरता टीका करणे गाजले होते.

१९८० ते २०१९ या कालखंडात शरद पवारांचे समर्थक मानले जाणाऱ्या सोपल यांचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर निकटचे संबंध होते. अजितदादांच्या सातत्त्याने सोपल यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभाही गाजल्या होत्या. सोपल यांच्या माध्यमातून अजितदादांनी तालुक्याला मोठा विकास निधी मिळवून दिला होता. सोपल यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे अजितदादांबरोबरचे संबंध हे जिल्ह्यात चर्चेचा विषय होते. जिल्ह्यात मोहितेपाटील गटाला शह देण्यासाठी अजितदादा, सोपल यांच्या रणनीतीचा वापर करत असल्याचेही चित्र त्याकाळात निर्माण झाले होते. २०१९ नंतर आज पर्यंत ठाकरे गटात असणाऱ्या सोपल यांची ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा वेळोवेळी रंगली आहे. राष्ट्रवादीमध्ये अजितदादांचे पारडे आज जड असल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर अजितदादांचे संख्याबळ निर्णायक रित्या वाढले तर सोपल राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच २०११ सालापासून २०२१ पर्यंत बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना साथ देणाऱ्या माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी राष्ट्रवादीकडे झुकण्याचा निर्णय घेतला, मात्र बारबोलेंनी घेतलेल्या या निर्णयानंतर त्यांच्या पुढे खडतर परिस्थिती निर्माण झाली. बारबोले राष्ट्रवादीत आले आणि राज्यातले महाविकास आघाडी सरकार गडगडले. त्याच प्रमाणे वर्षभरानंतर आता राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये बारबोलेंसमोर शरद पवारांच्या पाठीशी रहायचे कि अजितदादांचे नेतृत्व स्वीकारायचे हा यक्ष प्रश्न आहे. एकंदरीतच सोपल व बारबोले यांच्या राजकारणावर, अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे साधक बाधक परिणाम होणार आहेत. आगामी काळात हे दोन नेते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाबरोबर राहतात याबाबत बार्शीकरांमध्ये उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.