बार्शी (सचिन अपसिंगकर)- ठाकरे गटातील पूर्वाश्रमीच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापति डॉ.निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभेच्या आमदारांपाठोपाठ आता विधानपरिषदेच्या सदस्यांनीही ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे ध्वनित होत असून मनीषा कायंदे पाठोपाठ डॉ.गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत घडवून आणलेल्या अभूतपूर्व बंडानंतर त्यांच्या पाठीमागे असलेल्या आमदारांची व पदाधिकार्यां ची संख्या वाढत असून ठाकरे गटाला गोर्हेध यांच्या पक्षांतरामुळे मोठा धक्का बसला आहे हे निश्चित. आगामी मुंबई महानगरपालिका व राज्यातील इतर महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला लागलेली ही गळती चिंताजनक आहे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीतील बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सोळा आमदारांवर कथित अपात्रतेची टांगती तलवार असल्याची चर्चा जोरधरत असताना व शिवसेनेच्या आमदारांमध्येही या नव्या सत्तासमीकरणांमुळे आपल्या संभाव्य मंत्रीपदे व महामंडळांच्या संख्येत येणार असलेली संभाव्य कपात लक्षात घेऊन चलबिचल सुरू होती. त्यामुळे शिवसेनेच्या दबावतंत्राला ठाकरे गटातील आमदार व पदाधिकारी बळी पडणार नाहीत, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. त्याचप्रमाणे अजितदादांच्या सत्तासहभागामुळे शिवसेनेच्या संजय सिरसाठांसह माजीमंत्री बच्चू कडू यांनीही तीव्र शब्दात व्यक्त केलेली नाराजीची विधाने लक्षात घेतली तर ठाकरे गटातून शिवसेनेत होणार्याक पक्षांतरांना लगाम बसेल अशी अपेक्षा होती.
तसेच मुंबईसह पुणे, नाशिक व राज्याच्या इतर भागात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे असे आवाहन करणारे फलक झळकले होते. त्यामुळे ही ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आणि राज ठाकरेंचे वक्तृत्व यांच्या संगमातून ठाकरे घराण्याच्या वलयाचे पुनरुज्जीवन होईल असा अंदाज बांधला जात होता. त्या दृष्टीने वातावरण निर्माण होत असताना डॉ. गोऱ्हे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. अजित पवारांनी नऊ आमदारांसह घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शिवसेनेबरोबरच भाजपाच्याही नेत्यांना रुचलेली नाही. कोल्हापूरच्या समरजितसिंह घाटगे पाठोपाठ रायगडच्या आमदार भारत गोगावलेनीही आपली नाराजी दर्शविली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा दिला असला तरी, एकंदरीतच भाजप-शिवसेना या पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र तयार होत आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साहेबांच्या सभांना प्रतिउत्तर देऊ असा इशारा दिला, तरी शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यातील येवलामध्ये सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पवार काका-पुतण्यांमुळे भविष्यात कलगीतूरा रंगणार हे उघड झाले आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपले बंधु व नूतनमंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा भेट घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पाहुयात राज्याचे राजकारण आगामी काळात कोणते वळण घेते?