मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेवटच्या दिवशी आपल्या भाषणाने सभागृह चांगलेच गाजवले. शिंदे गटाने ठाकरे गटावर केलेल्या आरोपांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही जे बाहेर केले ते आता विसरून जा, मुख्यमंत्र्यांचे भाषण पूर्णपणे राजकीय होते, अशी टीकादेखील अजित पवारांनी काल केली. आता भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली.
तसेच, अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेतला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते. त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तत्काळ विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.
अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केल्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असे बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी राजीनामा द्यावा, असेदेखील ते म्हणाले . दरम्यान, अजित पवार यांचे १४ मे २०१९ चे ट्विट भोसले यांनी दाखवले. अजित पवार २०१९ पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते; परंतु आता २०२२ मध्ये कशी त्यांना उपरती आली? असा प्रश्नही तुषार भोसले यांनी केला.