केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी (६ ऑगस्ट) पुण्याला भेट दिली. यावेळी नव्यानेच राज्य सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शाह पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. पुण्यातील आयोजित कार्यक्रमाला अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती. अमित शहा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. अमित शाह म्हणाले, “अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे यायला तुम्ही थोडा उशीर केलात.” यावेळी अमित शाह यांनी अजित पवार यांचं तर अजित पवारांनी अमित शाह यांचं खूप कौतुक केलं.
हेही वाचा :“अजित पवार गटाच्या पाठीशी शरद पवारांचा…”, भाजपा नेत्याचं मोठं विधान
अमित शाह यांनी अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवार यांनी वारंवार मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तसेच महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपण भाजपमध्ये सामील झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “अमित शाहांनी अजित पवारांना ७०,००० कोटींचं व्याज बरोबर मिळतंय ना? असं विचारलं असेल.”
हेही वाचा :“…तुम्हाला का वाईट वाटतंय?”, राऊतांच्या टीकेवर अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर
विजय वडेट्टीवार म्हणाले, काल खूप कौतुक झालं म्हणे, अमित शाह यांनी कौतुक केलं. कानातही कुजबूज केली म्हणे. कदाचित अमित शाह यांनी अजित पवार यांना विचारलंही असेल, बाबा रे ७०,००० कोटींचं व्याज बरोबर येतंय ना? ते पैसे सुरक्षित ठेवले आहेत का? कुठल्या तिजोरीत ठेवलेत? असं त्यांनी कानात विचारलं असेल. नाहीतर ते म्हणाले असतील, आता विसरून जा बाबा, आम्ही केलेला आरोप तुम्ही विसरून जा.