ऋणानुबंध हा प्रत्येकाच्या जीवनातील अमूल्य ऐवज असतो.त्या ऐवजातील प्रत्येक जिवाभावाची व्यक्ती ही एक सुवर्ण पान असते.माझ्या आणि परभणी जिल्ह्याच्या ऋणानुबंधाच्या खजिन्यातील एक सुवर्ण पान म्हणजे अशोक सोनी! आपल्या बुध्दीमत्ता, प्रामाणिक कष्ट आणि अभ्यासाच्या बळावर त्यांनी मराठवाड्यातील विधी व कायदा क्षेत्रात दबदबा आणि आदराचे स्थान निर्माण केले. परभणी जिल्ह्यातील कोणत्याही विधायक चळवळीत निष्ठा,तळमळ आणि निरपेक्ष भावनेने सक्रीय राहणारा स्पष्टवक्ता पण हळव्या मनाचा हा दिलदार माणूस!

या यशस्वी वकील व सामाजिक कार्यकर्त्याचा सत्तरावा वाढदिवस काल साजरा झाला.मला मात्र जणू माझ्या आणि अशोकभाऊंच्या दोस्तान्याचा ३६ वा वाढदिवस साजरा होत असल्याचा आनंद झाला. गेल्या सत्तर वर्षांत अशोकभाऊंच्या जीवनावर परमेश्वराने विविध भावरंगांची पखरण केली.त्यातील प्रत्येक रंगछटेचे वेगवेगळे भावविश्व होते.आई-वडिलांचा लाडका मुलगा, भावंडांचा समजूतदार भाऊ, विश्वासू आणि जिवाभावाचा मित्र, जबाबदार पती, कर्तव्य कठोर आणि तितकाच प्रेमळ पिता, मृत्यूशी झुंज देवून कोरोनाला उद्ध्वस्त करणारा रुग्ण आणि समाजाने बहाल केलेल्या प्रत्येक जबाबदारीला मनस्वी न्याय देणारा भला माणूस! अशा असंख्य भूमिकांना न्याय देणारे अशोकभाऊ सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! कारण संकटात सापडलेल्या माणसाने अशोकभाऊं पुढे विश्वासाने कैफियत मांडली आणि “मै हून ना!” असे म्हणत त्यांनी त्या माणसाला संकटमुक्त करावे,असाच त्यांचा शिरस्ता! याच त्यांच्या शिरस्ता व जीवनशैलीने त्यांनी जिवाभावाची शेकडो माणसे जोडली. माझ्याही जीवनातील प्रत्येक चांगल्या-वाईट वळणावर एक सच्चा दोस्त म्हणून त्यांनी मला खंबीर साथ दिली. अशा या मित्राला भरभरुन शुभेच्छा!
आदरणीय काकाजी,बाई,सौ.भाभीजी,भाऊ आणि सोनी परिवारातील प्रत्येक सदस्याने त्यांना प्रेम आणि विश्वासाचे पाठबळ हे अशोकभाऊंचे बलस्थान आहे. त्या बलस्थानास व अशोकभाऊंच्या संपन्न सत्तरीला माझा व तमाम मित्रांचा मानाचा मुजरा! अशोकभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपोआपच माझ्या परभणीतील आठवणींचा बांध फुटला.
माझ्या पत्रकारितेला ऐतिहासिक गती देण्याचे काम १९८६ साली लोकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून परभणीला झालेल्या माझ्या पोस्टिंगने केले. निर्मळ प्रेम, प्रोत्साहन, भक्कम पाठबळ आणि भरभरुन जिव्हाळा परभणी जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील प्रत्येक माणसाने माझ्या झोळीत टाकला! माझे औरंगाबाद लोकमत मधील प्रशिक्षण संपत असतानाच माझे गुरु स्वर्गीय आदरणीय बाबा दळवी, “गॉडफादर” आदरणीय राजेंद्रबाबू दर्डा व त्यावेळचे जाहिरात व्यवस्थापक ओमप्रकाशजी केला यांनी मला परभणी जिल्हा प्रतिनिधी म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला.खरे तर, मुळात बार्शी सोडणे माझ्या जीवावर आलेले होते.पण माझी आई स्वर्गीय अक्काने दिलेल्या धीर आणि आत्मविश्वासामुळे मी परभणीला रुजू होण्यासाठी तयार झालो.आमच्या बार्शीतील ख्यातनाम डॉ.अशोक लाड यांचा चिरंजीव अतुल माझा मित्र. त्याचा परभणीचा मावस भाऊ संजय मंत्री बार्शीत शिकायला होता.त्यामुळे संजयही माझा मित्र झाला होता.त्याची आई मंत्री मावशींचा माझा चांगला स्नेह होता. सुरुवातीला एवढेच काय ते माझे परभणी कनेक्शन! त्याच कनेक्शनचा धागा पकडून त्यावेळी मी संजय मंत्रीला त्याच्या वसमत रोडवरील घरच्या पत्त्यावर पोस्टकार्ड पाठविले आणि एके दिवशी थेट त्याच्या घरीच पोहोचलो !… अशा प्रकारे माझ्या जीवनातील परभणीतील माझे पहिले पाऊल पडले ! स्टेशनरोडवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ओसवाल कॉम्प्लेक्समध्ये दहा बाय बाराचे लोकमतचे जिल्हा कार्यालय होते.संजय आणि माझ्यावर मातृवत माया करणाऱ्या मंत्री मावशी नको नको म्हणत असतानाही मी कार्यालयातच राहण्याचा निर्णय घेतला.व्हीआयपीची एक छोटी ब्रिफकेस,दोन ड्रेस, सतरंजी आणि एक सोलापुरी चादर एवढाच माझा संसार होता.लोकमतचे एजंट स्व.बी.रामेश्वर,त्यांचे व्यवस्थापक रेड्डी, रेल्वे स्टेशनवरुन पार्सल आणणारे सायकल रिक्षावाले मामा, कार्यालयाजवळच चहाचा गाडा चालविणारा बालाजी आणि त्यावेळी शहर प्रतिनिधी म्हणून काम करणारे हरहुन्नरी हणुमंत चिटणीस, एवढेच काय ते माझे परभणीतील सुरुवातीचे विश्व! काही दिवस असेच गेले.माझ्या क्रिकेटवेडाने माझे पाय आपोआपच जवळच असलेल्या स्टेडियमकडे वळले.तिथे स्फूर्ती क्रिकेट क्लबचे प्रमुख संतोष बोबडे याचा परिचय झाला.माझा खेळ सर्वांनाच आवडला आणि मी स्फूर्ती टीममध्ये दाखल झालो.टीम म्हटलं की दोस्ताना आलाच!.

स्फूर्तीतूनच मग एकाच वेळी खासदार-आमदारपदापासून नगराध्यक्षपद भूषविण्याचा इतिहास घडविणारे स्वर्गीय शेषराव देशमुख यांचे चिरंजीव संजय देशमुख, अरुण कदम, अनिल मोरे,स्व.अशोक जावळे, ज्ञानेश्वर काकडे,इर्शाद शेख, भगवानराव देशमुख, जाधव, स्वर्गीय विलास खोबे ही मित्र मंडळी जोडली गेली.बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात प्राध्यापक असणारे देवानंद चिलवंत हे माझे मित्र विश्वनाथ कत्ती यांच्या मुळे माझ्या संपर्कात आले होते.तेही परभणीचे आणि स्फूर्ती ग्रुपचेच असल्याने मित्रांची मालिका अधिक गतीने सजली.संतोष बोबडेचे घर दादाराव प्लॉट या परिसरात होते.त्याच्या घरासमोरच दोन खोल्यांमध्ये कृषि विद्यापीठात अभियंता म्हणून कार्यरत असलेले सुरेंद्र वाघमारे,जि.प.मध्ये अभियंता असणारे मलिक कोणगुत्ते आणि त्यांचा मित्र अजय मलकुनाईक राहायचे.संतोषमुळे त्यांचा माझा परिचय झाला.थोड्या दिवसांतच मैत्री झाली व मी कार्यालयात न राहता चवथा रुम पार्टनर म्हणून त्यांच्यात दाखल झालो.दरम्यान कृषी विद्यापीठात शिकत असलेले बार्शीकर शाम खामकर (ते नुकतेच नोंदणी व भूमी अभिलेख खात्यातून उपसंचालक या पदावरून निवृत्त झाले) बार्शीत बालपण गेलेले आणि दिलीप सोपल साहेबांचे बालमित्र असलेले सिराजभाई रंगरेज हेही संपर्कात आले.शाम खामकर मुळे कृषी विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची खूप मोठी फळी माझ्याशी जोडली गेली.
विशेष म्हणजे ती सगळीच मंडळी त्या काळात स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी जिवापाड कष्ट करीत होती.(त्यातील शंभरहून अधिक विद्यार्थी मित्र स्पर्धा परिक्षेतून अधिकारी बनले.तीच मित्रांची फळी आजवरच्या आयुष्यात माझी “सायलेंट पॉवर” राहिली) एव्हाना मी लोकमतच्या कामात आणि परभणीत रमू लागलो होतो. त्याच काळात आमच्या कार्यालयानजिक पेढा हनुमान मंदिरा जवळ घर आणि कार्यालय असलेल्या अशोक सोनी वकील यांच्याशी दोस्ताना झाला.पुढे त्यांच्या मुळेच तत्कालीन आमदार विजय गव्हाणे,एकनाथराव सावंत, स्वर्गीय प्रताप बांगर वकील, स्वर्गीय जयराज जैन, सुभाष बाकळे,रमेश शर्मा असे अनेक मित्र जोडले गेले.बंडू पाचलिंग,दिपक चिमनचोळ कमलकिशोर अग्रवाल,राजू शिंदे, प्रभाकर लंगोटे, कृष्णा भाले, मोहन कुलकर्णी, फोटोग्राफर धनंजय ढालकरी, गंगाखेडचे डॉ.प्रफुल्ल ठाकूर,अहमद शेख अशा अनेक मित्रांसह माझा परिवार विस्तारत गेला.पत्रकारितेतही शरद देऊळगावकर सर, रवींद्र गंगाखेडकर सर, विजय जोशी सर, डॉ.रवींद्र रसाळ,हेमाताई रसाळ, दिलीप दीक्षित,डी.टी.कांबळे, हेमराज जैन, हेमराज जैन या ज्येष्ठ पत्रकारांनी माझ्या डोक्यावर त्याकाळत माझ्या डोक्यावर प्रेम आणि आशीर्वादाचा हात ठेवला.
सर्व वाटचालीत अनेकभाऊंची भूमिका आणि मोलाचा सहभाग असायचा.
-राजा माने,
- संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
-अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई. - प्रदेशाध्यक्ष,व्हाइस ऑफ मिडिया, महाराष्ट्र.