पुणे |
तब्बल ४७ वर्षांपूर्वी १९७५ सालच्या SSC जुनी ११ वी बॅच मधील पुण्यामध्ये असणारे १४ जण मेहेर रिसाॅल्ट यवत येथे गेले होते. लहानपणी एका वर्गात असणारे आम्ही मुल-मुली आज ४७ वर्षानी भेटलो. सर्वांना एकमेकांना पाहून खूप आनंद वाटला. या संदर्भात एकाने मनातल्या भावना व्यक्त केल्या….
एक आनंदमय सकाळ आज घेऊन आली मित्रत्वाचा एक सुखद अनुभव.
मनपटलावर विराजमान असणार्या असंख्य मित्रांपैकी काहीजणांना प्रत्यक्षात भेटण्याचा योग आज आला. यवत गावाजवळील मेहेर रिसाॅर्टवर जायच आहे बस तुमच्या ठिकाणी सकाळी ८ वाजता तुमच्यापर्यंत येईल” अस सांगितल.

सकाळीच नियोजित ठिकाणी ट्रॅव्हल बसमध्ये चढलो. माझी नजर सर्वांच्या अनोळखी नजरेत मलाच शोधत होती. हाय हॅलो वेलकमन स्वागत झाल. ओळखीने ओळख वाढत गेली. आपलेपणाची जाणीव झाली. बालपणी अजिबात न बोलणारे आम्ही मुलमुली गप्पांच्या क्षणात आठवणीच्या पुस्तकच पान पलटत क्षणांना सतेज करीत होतो. गप्पाष्टकांचा फड रंगला. एकेकाला गाडीमध्ये बसवत आमची बस मार्गस्थ झाली.
मेहेर रिसोर्टच्या भव्य प्रवेश दारातून विशाल प्रांगणात प्रवेश करीत आमच्या बसने आडोसा धरला आणि आम्हाला विस्तिर्ण निसर्गाच्या सानिध्यात मुक्त संचारण्याची संधी दिली.
निता व मिलिंदने पैशाचा हिशोब चुकता करुन प्रवेश पास घेतला.
गर्द झाडाच्या छायेमध्ये, कारंजाच्या तुषारात, सुंदर फुलांच्या ताटव्याच्या सानिध्यातला आमच्या मित्राच्या या पहिल्या भेटीतील *मैत्रीचा* थाट निराळाच होता. जणू हा निसर्ग आमच्या मैत्रीच स्वागतच करीत होता.
लता यापूर्वी या ठिकाणी आली होती. आम्हा सर्वांना हे ठिकाण दाखवाव आणि मैत्रीच्या नात्याचा श्री गणेशा करावा अस तिला मनोमन वाटल होत. आम्हा सर्वांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून तिची ही कल्यना साकार झाल्याच समाधान तिला झालं.
शिरा पोहे चहा मिसळ पाव याच सेवन झाल अन आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून पाण्याच्या विस्तिर्ण जलाशयाला भेट देण्यास गेलो. ओबडधोबड रस्त्यावरुन जाताना हादर्याने आमच्या मैत्रीच नात ठासून ठासून अधिक घट्ट होत होत. आम्हा मित्रांच स्वागत करण्यासाठी *घोरपड* क्षणभर मार्गावर आली *हीअभेद्य मैत्री अशीच फुलु दे* हा भाव मनीचा सांगून झाडीत लुप्त झाली.
उजनीचा विस्तिर्ण जलाशय आणि निसर्ग यांच दृश्य मनात साठवत आम्ही स्विमिंगपुलकडे निघालो. पाण्यात डुंबण्याच चित्र मनातच निर्माण केल. निळ्याशार पाण्यात मीच डुंबतो आहे अस मनोमनी चित्र प्रत्येकाजण मनात पहात होत. स्वत:च्या वयाचा मान राखावा लागतोय पण प्रत्येकाच मन मात्र अजूनही बालपणाच्या शैशवावस्थेमध्ये पहुडल होत.
गाण्याच्या तालावरचा रेन डान्स चालू होता. स्वत:च्या भावविश्वात रमताना सभोवतालच्या गोष्टीचा विसर पडतो तदवत आमचही झाल होत. आमच सर्वांच मन त्या पाण्याच्या तुषाराखाली गाण्याच्या ठेक्यावर नाचत होत आणि आम्ही वयान मोठे असल्याने आणि सभ्यपणे हात बांधून त्याच्याकडे पहात होतो. मनोमनी हा आनंद घेत आम्ही होडी कडे निघालो. तिथे गर्दी असल्याने आम्ही आमचा मोर्चा जेवणाकडे वळविला.
पदार्थाची रेलचेल आमची क्षुधा शमविण्यासाठी सज्ज होती. प्रत्येक पदार्थ *ओ माझी टेस्ट पहा ना!* अस खुणावत होता. आम्हीही सर्वांचा मान राखला ताटात सर्व पदार्थ घेत डायंनिग टेबल पर्यंत येत असतानाच आत्तापर्यत वेगवेगळ्या पात्रात असणारे पदार्थ, आमच्या ताटात येताच एकमेकात मिसळूनही गेले आणि त्यांनी त्यांची मैत्री अधिक घट्ट केली *आमच्या सर्वांच्या मैत्री सारखी.*
जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्वजण झाडाखाली असणार्या बाजेवर विसाव्यासाठी थांबलो. गप्पांचा, मिस्किल विनोदांचा, आठवणींचा पेटारा उघडला. अनेक क्षण जिवंत झाले. चर्चा रंगल्या. सुखदु:खाची देवाण घेवाण झाली. या क्षणी नसणार्या बार्शीतील मित्रांची विचारपूस झाली. गेटटुगेदरला सर्वांनी भेटायच, असाच मनसोक्त आनंद लुटायचा अस ठरल. गप्पाच्या ओघाने वेळेची मर्यादा ओलांडली होती.
ऊसाचा रस तयार आहे सर्वजण या. असे लताने फोन वरुन सांगितले. अन गप्पांचा न संपणारा सेशन अर्धवट सोडून सर्वजनांनी या आज्ञेचे पालन केले.
आम्ही आमचा मोर्चा ऊसाच्या रसाकडे वळविला. डायबिटीस असतानाही अनेकांनी या वर्ज असणार्या ऊसाच्या रसाचा आनंद घेतला. *अरे, तुम्ही मित्र हीच ह्या डायबेटीस वरची गोळी आता पर्वा कशाची.* अशी त्यांची मनोमन भावना झाली होती.
आमच्या मैत्रीच्या सुगंधानी सर्व परिसर आल्हाददायक झाला होता. अनेक आनंदाच्या क्षणाचे चित्र आमच्या मोबाईल मध्ये कैद झाले होते.
हुरडा, ढाळा, बोर, कणीस याचा आस्वाद सर्वांनी घेतला.
दिवस कलतीला लागला होता.
गप्पांच्या नादात दिवस सपंत आला हे कळले देखील नाही.
इतका वेळ झाडाच्या पानाआडून डोकावत आमच्या मित्रांच्या मैत्रीचा आनंद घेणारा सूर्य, *तुमची ही मैत्री निरंतर फुलत राहो* असा आशिर्वाद देत डोंगराआड अदृष्य झाला.
विश्रांतीसाठी बसलेले मित्र परतीच्या प्रवासासाठी जड अंत:करणाने निघाले. आम्ही सर्वांनी आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण मैत्रीसाठी कुर्बान केला होता.
इतकेवेळ शांत बसलेली बस *आमच्या आनंदाचे क्षणाच्या गाठोड्यासह* आम्हाला घेऊन परतीच्या प्रवासाला निघाली.
बस मध्ये पुन्हा गप्पा अन गाण्याच्या भेंड्या रंगल्या आम्ही सर्वांनी सर्व गायकांना पुन्हा जिवंत करुन आमच्या सुमधूर आवाजाने आमचा घसा साफ करुन घेतला.
गाण्याच्या सुरेली सुरात संगीत देऊन गाण रंगात आणण्याच काम बस करीत होती. गाण्याच्या या शेवटच्या टप्प्यात प्रत्येकाच्या विसाव्याच ठिकाण येत होत. सर्वांना ड्राॅप करीत ही मार्गस्थ होत होती.
सरते शेवटी ही बस सर्वांना आपापल्या ठिकाणी सोडून आमच्या मैत्रीचे किस्से आठवत मार्गस्थ झाली.
आम्ही या मैत्रीच्या आठवणीच्या क्षणांचे प्रतिबिंब मनात साठवून डोळ्याच्या पापणीआड असणार्या स्वप्नांच्या दुनियेत पहुडलो.
आमच्या या मैत्रीच्या दुनियेत
सफर घडवून आणणारे लता, निता, मिलिंद, राजा, सुनिल यांच विशेष कौतुक.
या आमच्या मित्रांच्या सफरीमध्ये आमच्या आनंदात सहभागी होणार्या सौ. सुवर्णा कुलकर्णी, सौ.विडेकर, सौ, क्षिरसागर यांचही अभिनंदन.
खरोखर मित्रांनो तुमच्या सहवासातील आनंदाचे सर्वच क्षण शब्दबध्द होऊच शकले नाही ते क्षण मी माझ्यात घट्ट धरुन ठेवलेत.
*ये दोसती हम नही छोडेंगे*
सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील आनंदी दिवसासाठी.
व्यंकटेश कुलकर्णी
बार्शी.