मुंबई । भारतीय जनता पक्षाने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजप बरोबर युती करतील का ? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवारही आहेत. अजित पवार यांचं भाजप काय करणार आहे हे माहीत नाही. युतीचं नेमकं गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाहीये. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधावरही प्रकाश टाकला आहे. नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जाण्यापासून शरद पवारांनी वाचवलं होतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे सलोख्याने संबंध राहिले आहेत. त्यामुळेच पवारांनी मोदी धार्जिणे राजकारण केलं आहे. मध्यंतरी पवार आणि मोदी एकाच मंचावर पाहायला मिळाले.
तसेच नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादीत फूट पडली. त्यानंतर हे दोन नेते भेटले. तरीही दोघांची देहबोली सकारात्मक होती, याकडे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे, अशी माहिती समोर येत आहे.
भाजपची मनसेला युतीची ऑफर? राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची चर्चा