या पृथ्वीवर माझ्या नावे एकही घर नाही, मला ईडीची चिंता नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स बजावले होते त्यामुळे एकच खळबळ उडाली होती यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना आणि नेत्यांना चौकशीसाठी इडीने नोटीसा बजावल्या होत्या अशातच आता ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे. आयएल-एफएस गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले आहे. या साऱ्या प्रकारावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले, ईडीची भीती घालून अनेक राजकीय नेत्यांचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. मात्र मी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत, त्यामुळे मला रात्री शांत झोप लागते.या पृथ्वीतलावर माझ्या नावावर एकही घर नाही. माझ्या नावावर घर नसल्यामुळे ईडीची चौकशी लागण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे ईडी चौकशीची आपल्याला कुठलीही चिंता नाही, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील हेही उपस्थित होते. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार असताना अनेक नेत्यांना आणि मंत्र्यांना ईडीने नोटीसा बजावल्या होत्या तसेच ईडीच्या नोटिसामुळे माजी मंत्री नवाब मलिक यांना जेल झाली होती तर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार लटकत आहे