Latest Marathi News

BREAKING NEWS

मंदिरातील घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ‘हे’ दिले निर्देश

0

नाशिक |

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत.

दरम्यान, ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल. त्यावेळीही एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दोन दिवसांपूर्वी रात्री उत्तर दरवाजातून काही तरुणांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. दरम्यान, खबरदारी म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने पोलिसांकडे पत्राद्वारे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याचा, तसेच त्र्यंबकेश्वर शहराच्या शांततेला बाधा आणण्याचा हा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी केली आहे. यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून एसआयटी स्थापन करून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.