२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे अशातच आता भारतीय जनता पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात आपले बडे नेते प्रचारासाठी आता पासूनच मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे सगळ्याच पक्षात निवडणूक लढण्यास उत्सुक असलेली नेते मंडळी मतदारसंघावर दावा करत आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. आपल्याला विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळावं, अशी अपेक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील खडकवास विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, अशी मागणी करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
मी खडकवासला मतदारसंघात या आधीच उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीचं या मतदारसंघातील काम मी आधीपासूनच सुरु केलं आहे. मी अनेक पदावर काम केलं आहे. तो अनुभव पाहता उमेदवारी मिळावी, अशी इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच मी उमेदवारी मागणार आहे, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.
तर दुसरीकडे रुपाली चाकणकर दुसऱ्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असं बोललं जात आहे. त्यावर ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहे त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या. कारण मला या गोष्टी तुमच्याकडूनच समजत आहेत, असं चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.