सध्या बीआरएस पक्ष महाराष्ट्रात आपला जाम बसवत असून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहे अशातच आता यावर काँग्रेसने थेट बीआरएस पक्षावर जोरदार निशाणा साधत भाजपाची बी टीम म्हणून हिणवले आहे. भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही.
मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे आहे लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. केसीआर यांनी ९ वर्षात तेलंगणात कोणतेही काम केलेले नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला.